गडचिरोली : ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरवताना कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरणाऱ्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांविरुद्ध तत्काळ ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात यावी, अशा शब्दांत राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शनिवारी आरोग्य यंत्रणेची कानउघडणी केली. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आरोग्यमंत्री आबिटकर दोन दिवसीय गडचिरोली दौऱ्यावर होते. १३ फेब्रुवारी रोजी त्यांनी भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे भेट दिली, तसेच अहेरी उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी सकाळी त्यांनी जिल्हा रुग्णालय व महिला व बाल रुग्णालयाला भेट देऊन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला.

त्यानंतर जिल्हा परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आरोग्य विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, रामदास मसराम, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, आरोग्य विभागाचे संचालक डॉ. विजय कंदेवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेताना सिरोंचा आणि कोरची हे तालुके लसीकरणात सर्वात तळाला असल्याचे वास्तव समोर आले. यावरून मंत्र्यांनी संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरले, सामान्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा देणे हे सरकारचे प्राथमिक कर्तव्य असून, त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर दोषी अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्याचे
आदेश त्यांनी दिले.

संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी विशेष नियोजन

जिल्ह्यातील ९९ गावांना आजही पक्के रस्ते नसल्याने पावसाळ्यातील सहा महिने या गावांचा संपर्क तुटतो. अशा २१२ संवेदनशील ठिकाणांची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन तिथे विशेष आरोग्य पथके तैनात करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. दुर्गम भागात सेवा देण्यासाठी डॉक्टर तयार नसतात, ही बाब लक्षात घेऊन अशा ठिकाणी सेवा देणाऱ्यांना विशेष प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला. तसेच, कर्मचारी आणि डॉक्टरांना मुख्यालयी राहण्यासाठी दर्जेदार निवासस्थाने उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.

माता मृत्यूंबाबत चिंता

जिल्ह्यात झालेल्या ६ माता मृत्यूंच्या घटनांबद्दल आबिटकर यांनी तीव्र चिंता आणि नाराजी व्यक्त केली. “माता मृत्यूचा दर शून्यावर आणण्यासाठी ‘१०२’ रुग्णवाहिका सेवेचा प्रभावी वापर करा. वेळेत उपचार मिळालेच पाहिजेत,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून जिल्ह्यातील ५४ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले, जेणेकरून रात्रीच्या वेळी प्रसूती किंवा आपत्कालीन उपचारात अडथळा येणार नाही.

गावपातळीवरील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हा उपक्रम गडचिरोली जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून स्थानिकांच्या सूचनांनुसार आरोग्य सेवांचे मॉडेल विकसित करण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.