‘एमपीएससी’कडून डॉ. संजीव कांबळे यांच्या नावाची शासनाला शिफारस

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालकपदाचा निकाल गुरुवारी जाहीर केला आहे. त्यात उपराजधानीतील डॉ. संजीव कांबळे यांची आरोग्य संचालक करण्याबाबतची शिफारस शासनाला करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य सेविकेचा मुलगा आरोग्य विभागातील महत्त्वाच्या आरोग्य संचालकपदाची सूत्रे स्वीकारणार आहे.

डॉ. संजीव कांबळे यांच्या आई प्रभा कांबळे या आरोग्य सेविका होत्या. त्यांनी नागपूर जिल्ह्य़ातील गुमथळा आणि कळमेश्वरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर त्यांच्या कार्यकाळात बहुतांश आरोग्य सेवा दिली आहे, तर संजीव यांचे वडील हे पोस्ट खात्यात लिपिक होते. सोयी-सुविधांपासून दूर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देताना प्रभा कांबळे यांनी गरिबांच्या वेदना जवळून बघितल्या. त्यावरून त्यांनी गरिबांना वैद्यकीय सेवा मिळाव्या म्हणून आपल्या मुलाला (संजीव) डॉक्टर करण्याचे निश्चित केले. मुलाला वैद्यकीय शिक्षणाच्या दरम्यान त्यांनी पूर्ण मदत केली. डॉ. संजीव कांबळे यांनीही आईच्या विश्वासाला सार्थ ठरवत वैद्यकीय शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.

उपराजधानीतील सार्वजनिक आरोग्य विभागात नोकरी मिळाल्याने त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. आजपर्यंत त्यांनी नाशिक, ठाणेसह राज्याच्या विविध भागात वेगवेगळ्या पदावर सेवा दिली. सध्या ते आरोग्य विभागात सहसंचालक कुष्ठरोग, पुणे येथे कार्यरत आहेत. नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आरोग्य संचालकपदाची जाहिरात काढल्याने त्यांनीही अर्ज भरत मुलाखत दिली होती. आयोगाने डॉ. कांबळे यांना सर्वोच्च गुण मिळाल्याने त्यांची आरोग्य संचालकपदाबाबत शासनाला शिफारस केली आहे. त्यामुळे लवकरच त्यांना शासनाकडून या नियुक्तीबाबत आदेश मिळेल. त्यानंतर ते त्यांच्या पदाची सूत्रे स्वीकारतील. डॉ. कांबळे यांचे आजपर्यंत ३२ राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर शोध प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत, तर त्यांची आरोग्यविषयक तब्बल ११ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

आरोग्य सेविका असलेल्या आईने (प्रभा कांबळे) प्रचंड मेहनत घेत मला डॉक्टर बनवले. सार्वजनिक आरोग्य विभागात आरोग्य संचालक म्हणून पदभार स्वीकारल्यावर राज्याच्या विविध विभागासह विदर्भात शासकीय रुग्णालयातील सेवा अद्ययावत करण्याला प्राधान्य देईन. त्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेईन.

डॉ. संजीव कांबळे