scorecardresearch

विदर्भाला जलतडाखा ; भंडारा जिल्ह्यातील १८ गावांचा संपर्क तुटला;  वर्धा-मोरणा नदी धोक्याच्या पातळीवर

अमरावती जिल्हयातील मोर्शी येथील दमयंती नदीत एक युवक वाहून गेला. अभिजीत वैद्य असे मृताचे नाव आहे.

विदर्भाला जलतडाखा ; भंडारा जिल्ह्यातील १८ गावांचा संपर्क तुटला;  वर्धा-मोरणा नदी धोक्याच्या पातळीवर
अतिवृष्टीमुळे भंडारा जिल्ह्यातील सुमारे १८ गावांचा संपर्क तुटला आहे.

नागपूर, पुणे : एरव्ही पावसाची दीर्घकाळ प्रतीक्षा करणाऱ्या विदर्भाला यंदा पावसाने झोडपून काढले. मंगळवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरपासून सुमारे २२ किलोमीटरवर असलेले विहीरगाव पाण्याखाली गेले. येथील २० ते २२ झोपडपट्टय़ांमध्ये पाणी शिरल्याने आपत्ती व्यवस्थापनाच्या चमूने त्यांना बोटीने बाहेर काढले. तर त्याचवेळी शहरातील भालदारपुरा येथील ३०० वर्षे जुन्या शिवमंदिराचा भाग लगतच्या घरांवर कोसळल्याने सहा महिन्यांच्या चिमुकल्यासह पाच जण जखमी झाले. अमरावती जिल्हयातील मोर्शी येथील दमयंती नदीत एक युवक वाहून गेला. अभिजीत वैद्य असे मृताचे नाव आहे.

नागपूरला मंगळवारी अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला. शहरात शिवमंदिराचा काही भाग कोसळून पाच जण जखमी झाल्याने त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पुन्हा हाहाकार उडाला आहे. वर्धा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून सहा गावांचा संपर्क तुटला आहे, तर सात मार्ग बंद झाले आहेत.

वर्धा नदीच्या उगमक्षेत्रात मोठय़ा प्रमाणात पाऊस होत असल्याने अप्पर वर्धा व निम्न वर्धा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्रात जोरधारा

अनुकूल स्थितीमुळे राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सक्रिय झालेला मोसमी पाऊस बुधवारीही (१० ऑगस्ट) कायम होता. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर कायम होता. आणखी एक दिवस या भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर राज्यात सर्वच भागांत पावसाचा जोर कमी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

चोवीस तासांतील पाऊस (मिलिमीटर)

माथेरान १३१, चिपळूण १२६, राजापूर १२०, महाड ११७, मंडणगड १११, खेड ११०, लांजा ९४, पालघर ९४, दापोली ८८, तळा ८८, मुरबाड ८८, जव्हार ८६, डहाणू ८२, खालापूर ८१, पोलादपूर ७४, वसई ७३, पेण ७२, महाबळेश्वर २१६, उल्हासनगर १९१, वेल्हे १४३, चांदगड १२५, शाहूवाडी ११३, राधानगरी १०८, भिवंडी ९२, इगतपुरी ८५, पन्हाळा ७५, आजरा ६२, भोर ४६ पालम २३, परंडा २१, हिमायतनगर २०, खैरगाव १९, धर्माबाद १४, तुमसर १९०, सडक अर्जुनी १८९, ब्रह्मपुरी १८३,  भंडारा ९०, नागपूर ८९.

पूरस्थिती..

सततच्या पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील १८ गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील मोहाडी शहरात चंदेश्वरी मंदिराजवळील नाल्याला पूर आल्याने नाल्यालगतच्या रस्त्यावरही पाणी साचले आहे. रस्ता पार करत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने चारचाकी वाहन पाण्यात तरंगू लागले. वेळीच लोक मदतीला धावून आल्याने या वाहनात असलेल्या दोघांचा जीव वाचवण्यात त्यांना यश आले. वाशीम जिल्ह्यातील मोरणा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.

राज्यात इतरत्र..

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम होता. गुरुवारीही या भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी राज्यात सर्वच भागांत पावसाचा जोर कमी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.