बुलढाणा : जून आणि जुलै २०२६ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूरस्थिती, चक्रीवादळ आणि गारपीटीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी २३ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी बुलढाणा जिल्ह्यासाठी तब्बल १० कोटी ७८ लाख ५७ हजार रुपयांची सर्वाधिक मदत मंजूर झाली आहे. जिल्ह्यातील ७ हजार ६५८ बाधित शेतकऱ्यांच्या ५ हजार ४८९.९१ हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानीसाठी ही मदत मिळणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिली.
राज्यातील १७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना मदत
मदत व पुनर्वसन विभागाने २७ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती, चक्रीवादळ आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर केला आहे. राज्यातील ११ हजार २०७ हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानीसाठी १७ हजार २४५ शेतकऱ्यांना एकूण २३ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ६६१ शेतकऱ्यांसाठी ३८ लाख ८७ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. अमरावती महसूल विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा या चार जिल्ह्यांतील ९ हजार ६८३ बाधित शेतकऱ्यांसाठी १३ कोटी ८० लाख ७४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी बुलढाणा जिल्ह्याला १० कोटी ७८ लाख ५७ हजार रुपये मिळणार आहेत.
अन्य विभागांनाही मदत
पुणे विभागातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील ६ हजार ५६५ शेतकऱ्यांसाठी ९ कोटी १३ लाख २२ हजार रुपये, तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ बाधित शेतकऱ्यांसाठी ४१ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
मदत थेट खात्यात जमा होणार
बाधित शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेली मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या जुन्या कर्जाच्या परतफेडीसाठी किंवा कर्जवसुलीसाठी वळती करून घेऊ नये, अशा कडक सूचना सर्व बँकांना देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी मदत पूर्णपणे त्यांच्या उपयोगासाठी उपलब्ध होणार आहे.
मदत वाटप करताना एकाच शेतकऱ्याला एकाच नुकसानीसाठी दुबार लाभ मिळणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
