बुलढाणा : नांदुरा तालुक्यात शनिवारी रात्री पावसाने थैमान घातले. यामुळे पुरात वाहून एक युवक दगावला असून आज त्याचा मृतदेह आढळून आला. दुसरीकडे विस जनावरे मृत्युमुखी पडली.
नांदुरा तालुक्यात शनिवारी रात्रभर पावसाने धुमाकूळ घातला. वडनेर ( ८१ .५ मिलिमीटर) आणि महाळुंगी ( ८४ मिलिमीटर) या महसूल मंडळामधील हजारो ग्रामस्थांना अतिवृष्टीचे थैमान अनुभवयास मिळाले. दरम्यान नांदुरा येथून माटोडा येथे जाणाऱ्या प्रशांत गजानन दांडगे (३०) हा युवक पुरात वाहून गेला. आज रविवारी त्याचा मृतदेह खुमगाव शिवारात आढळून आला.




हेही वाचा – यवमताळ : रेशनचा २८ टन तांदूळ जप्त; सण, उत्सवात सरकारी धान्याचा काळाबाजार उघड
दुसरीकडे नांदुरा तालुक्यातील लोणवाडी, महाळुंगी येथे रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे गाई, म्हशी आणि बैल अशी लहानमोठी २० ते २५ जनावरे दगावली. शेतात पाणी साचले आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.