नागपूर : विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा "रेड अलर्ट" दिला असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात पहाटेपासून मुसळधार पाऊस दाखल झाला असून अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने ठाण मांडले असून नागपूर वर्धेसह अनेक जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ग्रामीण भागात नदीनाले भरण्याच्या मार्गावर आहेत. लाखांदूर ते गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मार्गे जाणाऱ्या पिंपळगाव/को येथील नाल्यावरुन पाणी वाहत आहे. काही ठिकाणी प्रामुख्याने गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम येथे काही भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. दक्षिण पश्चिम नागपुरातील बऱ्याच भागात रात्री दोन ते पहाटे पाच या वेळेत वीज पुरवठ्याचा लपंडाव सुरू होता. तर काही भागात अजूनही विजसेवा ठप्प झाली आहे. राज्यातील अनेक भागात गेल्या ४८ तासांपासून मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भाकडे पाठ फिरवलेला मोसमी पाऊस पुन्हा एकदा विदर्भात दाखल झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देखील गुरुवारी रात्रीच्या सुमारास ढगफुटीसदृश्य पावसाने हजेरी लावली. वर्धा जिल्ह्यात देखील गुरुवारी पेंढरी व आजूबाजूच्या परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. दरम्यान आज सकाळपासूनच विदर्भात सगळीकडे पावसाचा जोर कायम आहे. गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. सिरोंचा आणि भामरागड तालुक्यातील काही भागात पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे या भागाला जोडणारे रस्ते बंद आहेत. नागपूर शहरात परिस्थिती बिकट असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. श्रीकृष्ण नगर येथील भारतीय विद्या भवन जवळ एका घरात पाणी शिरले असून घरातील लोकांना बाहेर काढले जात आहे तर गांधीबाग परिसरात एक मोठे झाड पडले आहे. वाठोडा परिसरात झोपडपट्टीत पाणी शिरले आहे. शहरातील रस्ते पाण्यात तुंबले आहेत. शहर तसेच ग्रामीण भागात सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका नागपूर शहराला बसला आहे. सिमेंट रस्त्यांमुळे आणि नालेसफाई च्या अभावामुळे तुंबणारे नागपूर शहर जलमय झाले आहे. ऐन पावसाळ्यात शहरात पुन्हा ठिकठिकाणी रस्त्याची कामे सुरू करण्यात आल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा "रेड अलर्ट" देण्यात आला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर गडचिरोली, यवतमाळ, गोंदिया, अमरावती येथेही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यात लाल नाला प्रकल्पचे सात तर नांदचे पाच दरवाजे उघडले, विसर्ग सूरू झाल्याने गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.