राष्ट्रीय महामार्गावर आता हेलिपॅडची सुविधा!

अपघातातील अत्यवस्थ जखमींना तातडीने हेलिकॅप्टरमधून रुग्णालयांत हलवले जाईल.

अवयवदानासाठी माध्यम प्रतिनिधी म्हणून विशेष कार्य केल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे खास प्रतिनिधी महेश बोकडे यांचा सत्कार करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सोबत  डॉ. माधवी खोडे,  डॉ. विभावरी दाणी, डॉ. संजय कोलते,  डॉ. संजय देवतळे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

नागपूर : राष्ट्रीय महामार्गावर लवकरच हेलिपॅडची सोय करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली. या सुविधेमुळे  रस्ते अपघातातील जखमींना हेलिकॅप्टरद्वारे तातडीने  रुग्णालयांत हलवता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र (झेड. टी. सी. सी.), वनामती, इंडियन मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी अवयवदानाचे देवदूत म्हणून विविध क्षेत्रातील नागरिकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. या समारंभात अवयवदानाचा धाडसी निर्णय घेणाऱ्या मेंदूमृत रुग्णांचे कुटुंबीय, डॉक्टर, पोलीस, पत्रकार यांचा गौरव करण्यात आला. यावेळी गडकरी म्हणाले, काही विकसित देशांत गरजेनुसार इमारतींवर हेलिपॅडची सोय आहे. भारतात ती नाही. परंतु देशातील राष्ट्रीय महामार्गावर हेलिपॅडची सोय केली जात आहे. त्यामुळे येथील अपघातातील अत्यवस्थ जखमींना तातडीने हेलिकॅप्टरमधून रुग्णालयांत हलवले जाईल. त्याने  अनेकांचे प्राण वाचू शकतील. अवयवदानातून  नागरिकांचे प्राण वाचू शकतात. त्यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राचे कार्य प्रेरणादायी आहे.  नागपुरात  शासकीय व खासगी रुग्णालयांतील खाटा  ० हजारांपर्यंत वाढवणे, जीवनरक्षण प्रणालीची संख्या वाढवणे, प्रत्येक रुग्णालयांना प्राणवायूसाठी स्वयंपूर्ण करण्यावर काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी मंचावर वनामतीच्या संचालिका डॉ. माधवी खोडे- चवरे, विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. संजय कोलते, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, रोटरी क्लब नागपूरच्या अध्यक्षा डॉ. जेरेस्टीन वॉचमेकर उपस्थित होते.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Helipad facility now on national highways union minister nitin gadkari akp