लोकसत्ता टीम
नागपूर : राज्यात एकीकडे मंगळवारी श्री गणेशाचे आगमनाची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे वर्धेतील एका कुटुंबातील ४७ वर्षीय मेंदूमृत व्यक्तीने अवयवदानातून जगाचा निरोप घेतांना पाच कुटुंबात प्रकाशाची पेरणी केली.




श्रीकांत पांडे (४७) रा. वर्धा असे मेंदूमृत रुग्णाचे नाव आहे. श्रीकांत हा खासगी कंपनीत नोकरीवर होता. काही दिवसांपूर्वी त्याची घरात प्रकृती बिघडल्याने तो भोवळ येऊन पडला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याला तेथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे),वर्धा येथे दाखल केले गेले. विविध वैद्यकीय तपासणीत त्याचा मेंदूमृत झाल्याचे पुढे आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांचे अवयवदानाबाबत समुदपेशन केले.
आणखी वाचा-झोपेत असलेल्या चिमुकलीच्या अंगावर पडला साप अन्…
कुटुंबियांनी होकार दर्शवताच या रुग्णाच्या अवयवाशी जुडणाऱ्या गरजू रुग्णांचा विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीकडून शोध सुरू झाला. त्यानंतर एक मुत्रपिंड वर्धेतील आचार्य विनोबा भावे रुग्णालयातील गरजू रुग्णात, दुसरा मुत्रपिंड एलेक्सिस रुग्णालयातील एका रुग्णात तर यकृत एलेक्सिस रुग्णालयातील रुग्णात प्रत्यारोपीत केले गेले. तर दोन्ही बुब्बुळ याच रुग्णालयातील नेत्रपेढीला दान दिल्याने ते पुढे दोन गरजू रुग्णात प्रत्यारोपीत केले जाणार आहे. त्यामुळे या एका रुग्णाच्या अवयव दाणातून पाच कुटुंबात प्रकाशाची पेरणी होणार आहे.