नागपूर : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रविरोधी कारवायांच्या शक्यतेमुळे गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीच्या आधारावर नागपूर पोलिसांनी ‘हायअलर्ट’ जारी केला आहे. रेल्वे स्टेशन, विमानतळ, संघ मुख्यालय, दीक्षाभूमी या ठिकाणी आजपासूनच सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

वाहतूक शाखेतील ३०० पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण २२०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. सीमेबाहेरून शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येणार आहे. नागपूरमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून संवेदनशील ठिकाणी बॉम्बशोधक व नाशक पथक, शस्त्रधारी जवान तैनात करण्यात आले आहेत. ‘हायअलर्ट’ गणेश विसर्जनापर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे.

नागपूर पोलिसांचा पाच दिवस महोत्सव

येत्या ११ ते १५ ऑगस्ट या पाच दिवसांत नागपूर पोलीस अमृत महोत्सव साजरा करणार असून पाचही दिवस विविध कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे. महिला सुरक्षा, सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती, मेडिको-लिगल शिबिराचे आयोजन पोलिसांनी केले आहे. पोलीस आयुक्तालयाच्या पटांगणात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ ऑगस्टला पोलीस मँरोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी पहिल्यांदाच ‘पाईप बँड’ नागपुरात बोलविण्याल आला आहे. लहान मुलांसाठी ‘प्ले झोन’, खवय्यांसाठी विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल्स लावण्यात येणार आहे. तसेच नागरिकांसाठी तक्रार निवारण कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.