scorecardresearch

बाजार समित्यांमध्ये वाण विचारात न घेता सरसकट गव्हाची एकाच दराने खरेदी, शेतकरी चिंतेत

गव्हापेक्षा ज्वारीला जवळपास ३००० रुपयाचे दर मिळत आहे

higher rates of sorghum
(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

वाशीम: रब्बीच्या हंगामातील गहू, हरभरा बाजार समित्यांमध्ये विक्रीस येत आहे. चांगला दर मिळेल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमी दर मिळत असल्याने त्यांचा हिरमोड होत आहे. आज वाशीमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अंदाजे तीन हजार क्विंटल गव्हाची आवक झाली आहे. बाजारात नवीन गव्हाला १९०० पासून २००० ते २२०० रुपये दर मिळत आहे. गव्हापेक्षा ज्वारीला जवळपास ३००० रुपयाचे दर मिळत आहे.

यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या पिकांना काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागल्याने शेतकऱ्यांनी रब्बीच्या हंगामात गहू आणि हरभरा पिकाची लागवड केली. शेतकऱ्यांनी नवा गहू काढल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विक्रीस दाखल होताच काही दिवस चांगला दर मिळाला होता. परंतु सद्यस्थितीत गव्हाचे दर वाढतील या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग होत आहे.

आणखी वाचा- वर्धा: विजेच्या कडकडाटात पाऊस; शेतकऱ्यांना ‘दामिनी’ वापरण्याचा सल्ला

वाशीमच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दररोज तीन ते साडेतीन हजार क्विंटल गव्हाची आवक होत आहे. सध्या गव्हाला १८०० पासून २००० पर्यत भाव मिळत आहे. जिल्ह्यात लोकवन या गव्हाच्या वाणाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यापाठोपाठ नर्मदा सागर, २४९६, २१८९, अजित या वाणाची पेरणी असते. बाजार समित्यांमध्ये वाण विचारात न घेता सरसकट गव्हाची एकाच दराने खरेदी होत असल्याने शेतकरीवर्गात नाराजीचा सूर उमटत आहे. तसेच खासगी बाजारामध्ये गहू महाग तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मात्र कमी दर मिळत नसल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे.

गव्हाच्या वेगवगळ्या जातीचे दर खासगी बाजारात अधिकचे असताना कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मात्र दर अत्यल्प आहेत. सरकारकडून अद्यापही गव्हाचे हमीभाव आलेच नसल्याने गव्हाचे दर वाढणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लागवडीपेक्षा उत्पन्न कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

आजचे दर
हरभरा : ४१०० ते ४७००

गहू : १९०० ते २२००

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 17:16 IST
ताज्या बातम्या