अमरावती : निसर्गातील ‘सफाई कामगार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिधाडांच्या (जटायू) संवर्धनसाठी राबविल्या जात असलेल्या मोहिमेला विदर्भात मोठे यश आले आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पापाठोपाठ आता मेळघाट व्याघ्र प्रकल्पातही तब्बल दहा वर्षांनंतर ‘हिमालयन ग्रिफॉन’ या वैशिष्ट्यपूर्ण गिधाडाचे दर्शन झाले आहे.
विशेष म्हणजे, कधीकाळी मेळघाटच्या जंगलातून नामशेष झालेल्या या गिधाडांचे अस्तित्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. राज्याच्या गिधाड संवर्धन मोहिमेतील हा एक मोठा टप्पा मानला जात आहे. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी आणि वनविभागाच्या संयुक्त प्रयत्नांचे हे फलित मानले जात आहे. मेळघाटात बुलडाणा जिल्ह्याच्या हद्दीत येणाऱ्या सोमठाणा परिसरात सलग नऊ महिने राबविण्यात आलेल्या विशेष संवर्धन कार्यक्रमामुळे मेळघाटात या गिधाडांचे पुनरागमन शक्य झाले आहे.
दहा वर्षांपूर्वी पर्यंत मेळघाटात गिधाडे आढळत होती. मात्र, अचानक ती पूर्णपणे दिसेनाशी झाली आहेत. यामागील कारणांचा सखोल अभ्यास बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि पक्षी निरीक्षकांनी केला. मेळघाटलगतच्या मध्य प्रदेशात बऱ्हाणपूर आणि लगतच्या जंगलात गिधाडे आढळत होती. मात्र, मेळघाटात का आढळत नाहीत? यावर संशोधन करण्यात आले. बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष किशोर रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमठाणा येथे अत्यंत संकटग्रस्त अवस्थेतील गिधाडांसाठी संवर्धन आणि प्रजनन केंद्र उभारण्यात आले. या कार्यात पक्षीमित्र भास्कर दास यांनी मोलाची भूमिका बजावली. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात एकूण बारा गिधाडांना विशेष पिंजऱ्यासारख्या संरक्षित खोलीत ठेवण्यात आले. त्या ठिकाणी त्यांना हळूहळू मास तोडणे, अन्नशोधणे आणि नैसर्गिकरित्या शिकार करणे, असे जगण्याचे प्रशिक्षण या गिधाडांना देण्यात आले.
सर्व गिधाडांवर सीसीटीव्ही कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात आली. त्यांना या ठिकाणी खाण्याचे शिकार करण्याचे आणि उडण्याचेदेखील प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेरामध्ये टिपण्यात आल्या आहेत. आणखी काय करता येईल, याचा सातत्याने अभ्यास करण्यात आला. आता या सर्व गिधाडांना त्यांच्या मुक्त संचाराकरिता सोडण्यात आले. विशेष म्हणजे ही गिधाडे मेळघाटातून थेट कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरातपर्यंत उडत गेली. या गिधाडांची संख्या आता वाढायला लागली आहे.
पुन्हा एकदा मेळघाटात मोठ्या संख्येने ही गिधाड दिसतील, असा विश्वास बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष किशोर रिठे यांनी व्यक्त केला. मेळघाटात दहा वर्षानंतर गिधाडे उडायला लागली असताना आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मेळघाटात हिमालयीन ग्रिफॉन गिधाडाचे देखील मेळघाटात दर्शन झाले आहे.
