महेश बोकडे

नागपूर : विदर्भातील आठ जिल्ह्यातील हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एचपी) चारशेहून अधिक पंपांवर नियमित पेट्रोल, डिझेलचा पुरवठा होत नसल्याने अनेक पंप कोरडे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांची भटकंती सुरू झाली आहे. कंपनीच्या अव्यवस्थापनेमुळे ही परिस्थिती ओढवल्याचे पंप मालकांकडून सांगण्यात येते.

हिंदूस्थान पेट्रोलियमचे (एचपी) नागपुरात एक प्रादेशिक कार्यालय आहे. कंपनीचा नागपूरजवळील खापरी परिसरात डेपो होता. तेथून नागपूरसह चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया या आठ जिल्ह्यांतील कंपनीच्या चारशेहून अधिक पंपांना इंधनाचा पुरवठा केला जात असे. २०१९ मध्ये हा डेपो बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर कंपनीने येथून फक्त पंपांना डिझेल पुरवठा सुरू ठेवला व पेट्रोलचा पुरवठा भारत पेट्रोलियमच्या डेपोतून केला जाऊ लागला. २०२० पासून खापरीतील एचपीच्या डेपोतून डिझेल पुरवठाही बंद झाला.

वर्धा जिल्ह्यातील दहेगाव येथे नायरा या खासगी कंपनीचा डेपो सुरू झाला. त्यामुळे एचपीने त्यांच्या पंपमालकांना नायरा कंपनीच्या डेपोतून पेट्रोल व डिझेल घेण्यास सांगितले. परंतु या डेपोची साठवणूक क्षमता मर्यादित असल्याने त्यांना नियमित पुरवठा करणे शक्य झाले नाही. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील आठ जिल्ह्यांतील एच.पी.च्या पंप मालकांनी वेळोवेळी मागणी नोंदवूनही पुरवठा होत नाही.

मी नुकताच रुजू झालो असून माहिती जाणून घेत आहे. सोमवारी या विषयावर माहिती घेऊनच काही सांगता येईल, अशी प्रतिक्रिया हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर कार्यालय विक्री व्यवस्थापक निहाल सिंग यांनी व्यक्त केली. कंपनीकडून नियमित इंधन पुरवठा होत नसल्याने हे पंप कोरडे पडतात. कंपनीने पुरवठय़ात सुधारणा करावी व पंप चालकांना देयके चुकते करण्यास काही दिवसांची सवलत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी केली.

पंपचालकांची आर्थिक कोंडी

एचपीकडून पूर्वी पेट्रोल पंप चालकांना पेट्रोल, डिझेल खरेदीचे देयके देण्यासाठी काही दिवसांची मुदत दिली जात होती. परंतु आता ती बंद केल्याने पंप चालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. इतर कंपनीत मात्र ही मुभा आताही सुरू आहे.