वर्धा : पक्ष्यांची दुनियाच न्यारी. जगात अजूनही नित्य नवे पक्षी आढळून येत आहेत. त्यामुळे पक्षीसूची दरवर्षी अद्यावत केली जात असते. तर आहे त्या पक्ष्यांच्या संसारास अधिक बहर यावा, त्यांची घरटी सुरक्षित असावी, नव्या पक्ष्यांचे आगमन व्हावे अशी कामना पर्यावरणप्रेमी तसेच पक्षी अभ्यासक करतात. हे त्यातले उदाहरण.

पाणपक्षी मिश्र वसाहत

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या पाणपक्षी मिश्र विणवसाहतीत प्रथमच दोन नवीन प्रजातींची घरटी बांधल्या गेली आहेत. हिंगणघाट येथील अशी ही वसाहत विदर्भात सर्वात मोठी पक्षी वसाहत समजल्या जाते. विदर्भातील या सर्वात मोठ्या पाणपक्षी मिश्र विणवसाहतीत (Heronry) यावर्षी प्रथमच मध्यम बगळा (Intermediate Egret) आणि मोठा बगळा (Great Egret) या दोन नवीन प्रजातींची घरटी आढळून आली आहेत. त्यामुळे पक्षी अभ्यासकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शासकीय परिसर आणि पक्षी थवे

हिंगणघाट येथील पंचायत समिती, तहसील कार्यालय व उपअभियंता कार्यालय परिसरातील वृक्ष इंग्रजकालीन आहेत. डेरेदार, पानांची सळसळ, किलबिलाट. या वृक्षांवर दरवर्षी शेकडो पाणपक्षी प्रजननासाठी घरटी बांधतात. २०२५ मध्ये झालेल्या दोन टप्प्यांतील घरटी गणनेत एकूण १ हजार ७३ घरटी नोंदविण्यात आली होती. दरवर्षी निसर्गसाथी या पक्षीप्रेमी संस्थेतर्फे विणवसाहतीतील घरट्यांची गणना केली जाते. यावर्षी (२०२६ )मध्ये पहिल्या टप्प्यातील घरटी गणना पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्यातील गणना सप्टेंबर महिन्यात करण्यात येणार आहे.

नियमित पक्षी निरीक्षण

निसर्गसाथी ग्रुपतर्फे या विणवसाहतीचे नियमित निरीक्षण केले जाते. आतापर्यंत येथे छोटा बगळा, गाय बगळा, रात ढोकरी, छोटा पाणकावळा आणि भारतीय पाणकावळा या पाच पाणपक्षांच्या प्रजाती दरवर्षी प्रजननासाठी घरटी बांधत होत्या.

यावर्षी प्रथमच मध्यम बगळा आणि मोठा बगळा हे पक्षी परिसरात दिसू लागल्याने ते घरटी बांधतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार या दोन्ही प्रजातींनी येथे यशस्वीरित्या घरटी बांधली आहेत. संस्थेचे प्रवीण कडू यांनी सांगितले की, या दोन्ही नवीन प्रजातींनी हिंगणघाटच्या विणवसाहतीची निवड केल्याने हा परिसर त्यांच्या दृष्टीने सुरक्षित व प्रजननासाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट होते.

मध्यम बगळा आणि मोठा बगळा या आकाराने मोठ्या पाणपक्षी प्रजाती आहेत. त्यांच्या समावेशामुळे हिंगणघाटची ही पाणपक्षी मिश्र विणवसाहत जैवविविधतेच्या दृष्टीने अधिक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील बनली आहे.प्रविण कडू यांनी केलेल्या आगस्ट महिन्यातील निरीक्षणात मध्यम बगळा चे पिलं बाहेर आली असून, मोठा बगळा अंडीवर बसून अंडी शेकताना दिसतो असे नोंदवले आहे.

पक्ष्यांचे निकोप प्रजनन

या यशाबद्दल पक्षी अभ्यासक राहुल वकारे,एम, एस, आर. शाद,अशोक भानसे,पंचशील थुल,ज्ञानचंद गहरवाणी, पवन दरणे,चित्रा इंगोले, प्रमोद इंगोले,यशवंत शिवणकर, प्रशांत भोयर,समीर बक्ष, शेखर जामूनकर, संतोष धनरेल, गणेश पोलकडे,अमित जोगे या शिवाय विदर्भातील अनेक पक्षी अभ्यासकानी आनंद व्यक्त केला आहे. ही संपूर्ण हिंगणघाटकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पक्ष्यांच्या शांततापूर्ण व निकोप प्रजननासाठी वन विभागाने या परिसरात डी.जे., फटाके आणि ध्वनी प्रदूषणावर निर्बंध घालावेत, अशी मागणी निसर्गप्रेमी व पक्षी अभ्यासकांनी केली आहे.