वर्धा : ब्रिटिश राजवटीच्या खुणा अद्याप विविध स्वरूपात टिकून आहेत. रस्ते, रेल, विविध वास्तू आणि शाळा पण. या राजवटीत मिशनरी हे धर्म प्रसारासाठी सक्रिय राहल्याचे म्हटल्या जाते. पण सोबतच शिक्षण प्रसारचे कार्य पण त्यांनी आवडीने केल्याचे दाखले आजही त्यांच्या नावे महानगरात उभी महाविद्यालये यातून दिसावे. हेच नव्हे तर ग्रामीण भागात त्यांची पावले पडल्याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. त्याकाळी हिंगणघाट हे कापूस व्यापारासाठी सर्वात मोठे केंद्र राहल्याचा इतिहास आहे. इथला कापूस थेट मॅचेस्टर ईथे गिरणीत जात असल्याची नोंद आहे. व्यापाराचे असे मोठे केंद्र मिशनरी मंडळींच्या नजरेतून सुटले नाही. शिक्षणाचे हे गाव प्रमुख केंद्र झाले. आज १५० वर्षापेक्षा अधिक इतिहास असलेल्या एक नव्हे तीन शाळा या गावात आहेत.

स्कॉटीश मिशनरी

सर्वप्रथम स्टिफन हिस्लॉप ( Rev. Stephen Hislop ) यांनी आपल्या स्कॉतीश मिशनरी सहकाऱ्यांना सोबत घेत विदर्भात शिक्षणाचे कार्य करण्यास सुरवात केली. हिंगणघाट येथे १८५६ साली येथे शाळा स्थापन केली. ही सुरवातीच्या शाळेपैकी एक. मुख्य उद्देश म्हणजे स्थानिक मुलांना इंग्रजी व मराठी माध्यमातून प्राथमिक शिक्षण देणे. विज्ञानाची ओळख यामुळेच झाली. हा शिक्षणाचा पाया ठरला. याच आधारे १८७० दरम्यान पालिका शाळा स्थापन झाल्या. आजही हिंगणघाटमध्ये जुन्या ऐतिहासिक शाळांच्या इमारती या मिशनरी काळातील ( Free Church Of Scotland ) स्थापत्यशैलीची साक्ष ठरतात. व्यापार केंद्र म्हणून वाढत्या लोकसंख्येस शिक्षित करण्यात या ( scotish Missnory ) शाळांचे योगदान मोठेच.

नवे नामकरण

या ब्रिटिशकालीन शाळांचे कालांतराने नामकरण झाले. ओल्ड टाऊन स्कुल ही शाळा आता लाला लजपतराय प्राथमिक शाळा म्हणून परिचित आहे. न्यू टाऊन स्कुल ही १८६७ साली स्थापन झाली. आज या शाळेचे नाव अभ्यंकर प्राथमिक शाळा असे आहे. १९१८ मध्ये नेहरू प्राथमिक शाळा स्थापन करण्यात आली. आता या तीनही शाळा हिंगणघाट पालिकेतर्फे चालविल्या जातात. अनुक्रमे १७५, १५९ व १०८ वर्ष झालेल्या या शाळा आहेत. त्यांना वारसा ( Heritage ) शाळा म्हणून ओळख आहे. पालिका मुख्यधिकारी उरकुडे हे सांगतात की या शाळांचे ऐतिहासिक दस्तावेज आम्ही शोधत आहोत. पण राज्य शासनाच्या यू – डायस प्रणालीत या शाळा स्थापनेचे वर्ष ब्रिटिशकालीनच आहे.

शाळाप्रेमी म्हणतात…

हा ऐतिहासिक वारसा जपला जावा म्हणून शहरातील काही पुढे आले आहेत. निसर्गसाथी संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक प्रवीण कडू म्हणतात की या शाळा हिंगणघाट शहराच्या सुवर्ण क्षणाच्या साक्षी आहेत. हे पुढील पिढीस ज्ञात असावे म्हणून आम्ही पालिकेस काही सूचना केल्यात. या वारसा शाळा म्हणून त्याचे जतन करण्यासाठी शासनास निधी मागावा. शाळांची पत वाढावी म्हणून प्रयत्न झाले पाहिजे, असा सूर आहे. प्रथम शाळेच्या दर्शनी भागात वारसा शाळा ( Heritage School ) असा फलक लावून सुरवात करावी.

अन्य सूचना

शाळेत वारसा कोपरा ( Heritage Corner ) निर्माण करीत संग्रहालय स्थापन करावे. शाळेच्या visit book मधील शेरे वाचायला मिळावे. इतिहास लिहून काढावा. जुन्या वास्तूचे फोटो ठेवावे. पहिले मुख्याध्यापक, शिक्षक यांची नावे लिहावी. जुने हजेरी बुक, घंटा, जुनी पुस्तके, ध्वज आदी वस्तूंचे प्रदर्शन लावावे. यासह अन्य सूचना पालिका प्रशासनास झाल्या आहेत. या शाळा पुढेही टिकल्या पाहिजे, अशी भावना व्यक्त होते. या तीनही शाळाचे नूतनीकरण प्रस्तावित असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.