नागपूर : हिंगणा ‘एमआयडीसी’तील नेको हेवी इंजिनिअरिंग कास्टिंग लिमिटेड कंपनीत कन्व्हेयर पट्ट्यात हात अडकून ३० वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. संबंधित कामगाराची नियुक्ती नळजोडणी सहाय्यक म्हणून झाली असताना त्याला प्रशिक्षण आणि आवश्यक सुरक्षासाधनांशिवाय धोकादायक ठिकाणी काम करण्यासाठी पाठविण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर कारखान्यांमधील यंत्रांची सुरक्षा, अकुशल कामगारांची धोकादायक कामांवर नियुक्ती आणि आपत्कालीन यंत्रणांच्या उपलब्धतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ‘असोसिएशन ऑफ सोशल अँड आरटीआय ॲक्टिव्हिस्ट्स’चे अध्यक्ष तथा निवृत्त भारतीय महसूल सेवा अधिकारी संजय थुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून स्वतंत्र सुरक्षा तपासणीची मागणी केली आहे.
हिंगणा ‘एमआयडीसी’मध्ये नेमके काय घडले?
थुल यांच्या निवेदनानुसार, रविवारी नेको हेवी इंजिनिअरिंग कास्टिंग लिमिटेड कंपनीत काम करताना रोहित रामदुलार चौबे (३०) यांचा हात लोखंड वितळविणाऱ्या भट्टीजवळील वाळू आणि मातीच्या क्रेनला जोडलेल्या कन्व्हेयर पट्ट्यात अडकला. या अपघातात गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.
रोहित यांची नियुक्ती कोणत्या कामासाठी झाली होती?
उपलब्ध माहितीनुसार, रोहित यांची नियुक्ती नळजोडणी सहाय्यक म्हणून करण्यात आली होती. मात्र, त्यांना योग्य प्रशिक्षण, आवश्यक प्रमाणपत्र किंवा सुरक्षासाधने न देता धोकादायक आणि उंच ठिकाणी कामासाठी तैनात करण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या दाव्याची सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी थुल यांनी केली.
या मृत्यूमुळे कुटुंबावर कोणता आघात झाला?
रोहित यांच्या पश्चात पत्नी आणि अवघ्या चार महिन्यांचे बाळ आहे. घरातील कमावत्या तरुणाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. पीडित कुटुंबाला तातडीने योग्य आर्थिक भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सर्व कारखान्यांच्या तपासणीची मागणी का करण्यात आली?
ही घटना केवळ एका कारखान्यातील कथित निष्काळजीपणापुरती मर्यादित नसून औद्योगिक सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी दर्शविणारी आहे, असे थुल यांनी म्हटले आहे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने राज्यातील सर्व ‘एमआयडीसी’मधील यंत्रसामग्री, कन्व्हेयर पट्टे आणि आपत्कालीन यंत्रणा यांची स्वतंत्र व कठोर सुरक्षा तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
अकुशल आणि कंत्राटी कामगारांबाबत कोणती मागणी आहे?
कंत्राटी किंवा सहाय्यक कामगारांना आवश्यक प्रशिक्षण आणि अधिकृत प्रमाणपत्राशिवाय अतिजोखमीच्या कामांवर पाठविण्यास कठोर बंदी घालावी. प्रत्येक कामगाराला संबंधित यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण आणि वैयक्तिक सुरक्षासाधने दिल्याशिवाय कामावर नियुक्त करू नये, असे निवेदनात म्हटले आहे.
आपत्कालीन सुरक्षेसाठी काय उपाय सुचविण्यात आले?
सर्व जड यंत्रांवर सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी आपत्कालीन ‘बंद कळ’ बसविणे सक्तीचे करावे. अपघात झाल्यास यंत्र तत्काळ बंद करता आले पाहिजे. तसेच प्रत्येक पाळीत प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपस्थित ठेवण्याची सक्ती करण्याची मागणी आहे.
व्यवस्थापनावर कारवाईची मागणी आहे का?
कारखाना व्यवस्थापनाकडून निष्काळजीपणा झाला का, याची वेळेत कायदेशीर चौकशी करावी. दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला त्वरित योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी थुल यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडे नेमकी विनंती काय?
औद्योगिक विकासाच्या नावाखाली कामगारांच्या जिवाशी खेळ करता येणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने या घटनेत तातडीने हस्तक्षेप करून औद्योगिक सुरक्षेबाबत कठोर धोरणात्मक पावले उचलावीत, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.
