Hingoli Drunk Headmaster Suspended: मद्यपी मुख्याध्यापकाला निलंबित करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील लिंबाळा गावातील ग्रामस्थांना यश आले आहे. ग्रामस्थांच्या या आंदोलनात कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके देखील सहभागी झाले होते. अखेर दिपके आणि ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश आले असून, मद्यपी मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आल्याची माहिती स्वत: दिपकेंनी एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे.

मुख्याध्यापक निलंबित

हिंगोली जिल्ह्यातील लिंबाळा गावातील शाळेचा मुख्याध्यापक मद्यपी असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. मुख्याध्यापकाला निलंबित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. निलंबित केले जात नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार देखील ग्रामस्थांनी केला. या आंदोलनात अभिजीत दिपके देखील सहभागी झाले. अखेर, ग्रामस्थांच्या मागणीला यश आले असून, मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. अभिजीत दिपकेंनी मुख्याध्यापकाला निलंबित केल्याची माहिती दिली.

व्हिडीओद्वारे दिली दिपकेंनी माहिती

दिपकेंनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओनुसार, त्यांनी हा विजय लिंबाळा गावचे ग्रामस्थ आणि अब्दुल व त्याच्या मृत वडिलांना समर्पित केला. अब्दुलच्या वडिलांचा खून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप दिपकेंनी केला आहे. मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले असून, हा लिंबाळा गावातील ग्रामस्थांसाठी पहिला मोठा विजय आहे, असेही दिपके म्हणाले.

…तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार

“ग्रामस्थांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आज हा निर्णय झाला. अन्यथा हा निर्णय झाला नसता. आपल्याचा असंच पुढे येऊन लढायचं आहे. आता केवळ मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. आपल्याला शाळेत शिक्षकांचा स्टाफ हवा आहे. नवीन बाकं हवीयेत, तोपर्यंत हे आंदोलन सुरु ठेवायचंय”, असेही दिपके यावेळी म्हणाले.