चंद्रपूर : महापालिका राजकारणात सक्रिय झालेल्या अनेक नेत्यांना लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला हा इतिहास आहे. या इतिहासाची पुनरावृत्ती राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या रूपात पुन्हा एकदा झाली. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महापालिकेत भाजपचे ४२ पेक्षा अधिक नगरसेवक होते. मात्र, महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या कमिशनखोरीचा फटका मुनगंटीवार यांना पराभवाच्या रूपात बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत महापालिका, जिल्हा परिषद व नगर परिषद अतिशय महत्त्वाची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत आपल्याच पक्षाची सत्ता राहावी असा आग्रह काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांचा राहिला आहे. मात्र, चंद्रपूर महापालिकेच्या राजकारणात सक्रिय झालेल्या नेत्याला नेहमीच पराभवाचे चटके सहन करावे लागत असल्याचा इतिहास आहे. हेही वाचा.WORLD EYE DONATION DAY : महाराष्ट्रात अंधत्व निवारण कार्यक्रमाची मंदगती ; वर्षभरात केवळ….. अगदी सुरुवातीपासून बघायचे झाले तर काँग्रेस नेते तथा राज्याचे माजी मंत्री श्याम वानखेडे चंद्रपूर नगर परिषद राजकारणात सक्रिय झाले होते. मात्र, १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांनीच त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर महापालिकेच्या राजकारणात अधिराज्य गाजवणारे धुन्नू महाराज ऊर्फ गयाचरण त्रिवेदी यांनाही नगराध्यक्ष होता आले. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, शोभा पोटदुखे यांनाही महापालिका राजकारणात सक्रिय राहणे भावले नाही. विधानसभा निवडणुकीत या दोघांनाही पराभव बघावा लागला. काँग्रेसचे हेवीवेट नेता तथा विधानसभा, राज्यसभा व लोकसभा या तिन्ही सभागृहात काम केलेले कामगार नेते नरेश पुगलिया महापालिका राजकारणावर पकड ठेवून होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांनाही पराभव बघावा लागला. माजी नगराध्यक्ष बिता रामटेके यांनीही विधानसभेची निवडणुक लढवली. परंतु, त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. माजी केंद्रीय मंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे देखील महापालिका राजकारणात सक्रिय होते. त्यांनाही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव बघावा लागला. मागील साडेसात वर्षांपासून महापालिका राजकारणात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार गटाचे वर्चस्व होते. भाजपचे ४२ पेक्षा अधिक नगरसेवक महापालिकेत होते. मात्र मुनगंटीवार पालिकेच्या राजकारणाकडे व्यक्तिश: लक्ष द्यायला लागले आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत २ लाख ६० हजार मतांनी पराभव झाला. महापालिकेत सलग तीन टर्म मुनगंटीवार समर्थक महापौर होत्या. हेही वाचा.‘एमपीएससी’च्या परीक्षा लांबल्याने विद्यार्थी चिंतेत! मात्र, पालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या कमिशनखोरीमुळे मुनगंटीवार यांची बदनामीच अधिक झाली. महापालिकेत आर्थिक गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे चर्चेत आली. महापौरांच्या नविन गाडी खरेदीचा विषय असो की, महापौरांच्या प्रभागात विनानिविदा झालेली विकास कामे असो, शहरातील नाल्या, रस्त्यांपासून तर स्वच्छता, अवैध बांधकाम तथा इतर असंख्य विषय वर्तमानपत्रात वेगवेगळ्या पद्धतीने गाजले. त्याचाही फटका मुनगंटीवार यांना बसला. त्यामुळेच ४२ पेक्षा अधिक नगरसेवक भाजपा गटात असतानाही मुनगंटीवार यांना चंद्रपूर शहरात अतिशय कमी मते मिळाली. हेही वाचा.यवतमाळ : महागाव तालुक्यात सशस्त्र दरोडा, ३० लाख रोख व १७ तोळे सोन्याचे दागिने लुटले; महिलांना अमानुष मारहाण दोन्ही महापौरांच्या प्रभागासोबतच महानगर अध्यक्ष, माजी महानगर अध्यक्ष, महासचिव तसेच महिला अध्यक्षांच्या प्रभागात कमी मत मिळाल्याने मुनगंटीवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, पालिकेतील भाजपचे लोकप्रतिनिधी, नगरसेवक ठेकेदार झाले होते. त्याचाही फटका बसला. एकप्रकारे महापालिका राजकारणात सक्रीय झालेल्या मुनगंटीवार यांच्या पराभवाने इतिहासाची पुनरावृत्ती झाली असेच म्हणावे लागेल.