नेत्ररोग तज्ज्ञांच्या संघटनेचे निरीक्षण

होळीत वापरल्या जाणाऱ्या रासायनिक रंगामध्ये वाळू, काच, पावडर, शिसे यासह इतरही घातक पदार्थ असतात. ते डोळ्यात गेल्याने दरवर्र्षी २० हून अधिक जणांच्या डोळ्यांवर परिणाम होतो. मेडिकल, मेयो, डागा या तीन शासकीय रुग्णालयांत या काळात  अशाप्रकारे  सुमारे २० ते ३० तर खासगी रुग्णालयात याहून दुप्पट रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा केला जातो. उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात होळीत रंग खेळणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. फुग्यांमध्ये रंग भरून ते नागरिकांवर भिरकावण्याचे प्रकार या काळात हमखास होतात. त्यामुळे काहींच्या डोळ्याला इजा होते. वर्षभरात देशातील सर्व  शासकीय व खासगी रुग्णालयात डोळ्यात रासायनिक पदार्थ गेल्यामुळे येणाऱ्या रुग्णांपैकी तब्बल १८ टक्के रुग्ण हे केवळ होळीचा रंग डोळ्यात गेल्यामुळे जखमी झालेले असतात. रुग्णांची ही संख्या  केवळ होळीच्या दोन दिवसांतील  आहे.  मेडिकल, मेयो, डागा या तीन शासकीय रुग्णालयांत गेल्या होळीत डोळ्यात रंग गेलेले सुमारे ३० रुग्ण उपचाराकरिता आले. पैकी ७ रुग्ण हे गंभीर गटातील होते. त्यातील चौघांच्या दृष्टीवर परिणाम झाला. शहराच्या खासगी रुग्णालयात याहून जास्त रुग्ण उपचाराकरिता येतात, परंतु तेथील नोंदी ठेवल्या जात नसल्याने अचूक आकडेवारी पुढे येत नाही.

डोळ्यांसाठी धोकादायक

  • रंगातील चमकणारे पदार्थ डोळ्यात गेल्यास बुब्बुळ जखमी होऊ शकतो
  • रंगाचे फुगे डोळ्यावर लागल्यास जखम होऊ शकते
  • लेन्स लागलेल्या बुब्बुळावर फुगे लागल्यास ते सरकू शकते
  • रंगात दूषित पाणी वापरल्यास त्यामुळे डोळ्यात जंतू पसरू शकतात
  • ओल्या फरशीवरून पडल्यास डोळ्याला इजा होऊ शकते

घ्यायची काळजी

  • रासायनिक रंगाचा प्रयोग टाळावा
  • डोळ्याला इजा झाल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या
  • डोळ्याच्या शेजारी रंग लागल्यास ते काढण्याकरिता क्रिमचा वापर करा
  • चष्मा वा गॉगल लावून होळी खेळा
  • होळीत डिस्पोसेबल कॉन्टेक्ट लेन्स घाला
  • प्रवास करताना रेल्वे, बस वा चारचाकीचे काच बंद ठेवा
  • रंग लावणाऱ्याला डोळ्यावर वा त्या शेजारी ते लावू देऊ नका
  • ओल्या फरशीवर धावणे व कुदणे टाळा
  • लहान मुलांनी फूल बाहीचे शर्ट व जिन्स पॅन्ट घालावे
  • रंगाकरिता स्वच्छ पाणी मुलाला द्या