यवतमाळ: रंगांचा उत्सव आणि अनिष्ट प्रवृत्तींचा नाश करणारा ‘होळी’ सण यंदा खगोलशास्त्रीय दृष्टीने अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. येत्या २ मार्च रोजी सोमवारी देशभरात होलिकादहन केले जाईल, तर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ३ मार्च रोजी होणाऱ्या ग्रस्तोदित चंद्रग्रहणामुळे धूलिवंदनाच्या उत्साहावर ग्रहणाचे काहीसे सावट असेल. मात्र, धर्मशास्त्रातील नियमांचे पालन करून रंगांचा हा सण आनंदाने साजरा करता येईल, असे पंचांगकर्त्यांचे म्हणणे आहे.

सोमवार, २ मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्तानंतर ‘प्रदोषकाळात’ होलिकादहन करणे शास्त्रसंमत आहे. पौर्णिमा तिथी सोमवारी पहाटे ५:५५ वाजता सुरू होणार असून ती मंगळवारी सायंकाळी ५:०७ वाजेपर्यंत असेल. त्यामुळे सोमवारी सायंकाळी विहित मुहूर्तावर होळी पेटवून होळी साजरी केली जाईल. मंगळवारी, ३ मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण हे भारतात ‘ग्रस्तोदित’ स्वरूपात दिसणार आहे. म्हणजेच, जेव्हा चंद्र उगवेल तेव्हा त्याला आधीच ग्रहण लागलेले असेल.

दुपारी ३:२० मिनिटांनी सुरू होणाऱ्या या ग्रहणाचा आरंभ भारतात दिसणार नाही. ग्रहणाचा मोक्ष (समाप्ती) सायंकाळी ६:४८ वाजता होईल. मंगळवारी सूर्योदयापासूनच ग्रहणाचे वेध सुरू होतील. सामान्य व्यक्तींसाठी अन्नाचा त्याग महत्त्वाचा असला, तरी लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींनी सकाळी ११:०० वाजेपासून वेध पाळावेत, असे धर्मशास्त्र पारंगत व्यक्तींचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, वेधकाळात देवाची पूजा-अर्चा, अभिषेक किंवा पौर्णिमेचा कुळधर्म करण्यास कोणताही निषेध नाही. केवळ भोजन करणे निषिद्ध मानले जाते. त्यामुळे देवाला अगदी थोडा नैवेद्य दाखवून तो गाईला द्यावा आणि स्वतः केवळ तीर्थ किंवा अन्नाचा वास घेऊन ‘प्रसाद’ ग्रहण करावा. गुरुजींना किंवा सुवासिनींना कोरडा शिधा देऊन धार्मिक विधी पूर्ण करता येतील, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

धुळवड आणि रंगांचा उत्साह कसा टिकवाल?

ग्रहणाचा वेध असला तरी ३ मार्च रोजी धूलिवंदन आणि रंग खेळण्यास शास्त्राने परवानगी दिली आहे. सकाळी वेध पाळत असताना नागरिक रंगांचा आनंद घेऊ शकतात. केवळ सायंकाळी जेव्हा ग्रहणाचा पर्वकाळ (सायंकाळी ६:२२ ते ६:४३) असेल, तेव्हा रंगोत्सव टाळणे अधिक श्रेयस्कर ठरेल. ग्रहणाचा मोक्ष झाल्यानंतर म्हणजेच ६:४८ नंतर शुद्धीसाठी ‘मोक्षस्नान’ करून भोजन घेता येईल, असे येथील अभ्यासक महेंद्र महाजन महाराज यांनी सांगितले.

राशीभविष्य: कोणाला शुभ तर कोणाला अनिष्ट फळ !

ज्योतिषशास्त्रानुसार, या ग्रहणाचे १२ राशींवर वेगवेगळे परिणाम दिसून येतील, असे सांगितले जाते. मिथुन, तुला, वृश्चिक आणि मीन या राशींना ग्रहणाचे शुभ फळ मिळणार असल्याचे सांगितले गेले. मेष, कर्क, धनु आणि कुंभ या राशींना मिश्र फळ तर वृषभ, सिंह, कन्या आणि मकर या राशींसाठी हे चंद्रग्रहण अनिष्ट फळ देईल, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. यंदाची होळी ही भक्ती, निसर्ग आणि खगोलशास्त्राचा संगम असणार आहे. त्यामुळे वेळेचे नियोजन करून आणि शास्त्रशुद्ध नियम पाळून हा सण साजरा करण्याचे आवाहन पंचांगकर्ते व पुरोहितांनी केले आहे.