नागपूर : होळी तसेच सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या प्रवासी गर्दीचा निचरा करण्यासाठी विविध मार्गांवर विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई–नागपूरसह सावंतवाडी रोड, बनारस, गोरखपूर, समस्तीपूर, दानापूर तसेच पुणे–नागपूर, हजरत निजामुद्दीन व दानापूर या मार्गांवर या गाड्या धावणार आहेत.

मुंबई–नागपूर द्वैसाप्ताहिक विशेष

मुंबई–नागपूर द्वैसाप्ताहिक विशेष (१० फेऱ्या) गाडी ही २२ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत दर रविवारी व मंगळवारी पहाटे ००.२० वाजता मुंबईहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५.१० वाजता नागपूरला पोहोचेल. परतीची गाडी नागपूरहून दर रविवारी व मंगळवारी रात्री २०.०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १३.३० वाजता मुंबईत पोहोचेल. २२ व २४ फेब्रुवारी रोजी या गाड्या विशेष म्हणून, तर १, ३ व ८ मार्च रोजी होळी विशेष म्हणून धावतील.

या गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे असतील. संरचनेत एसी-दोन टियर, एसी-तीन टियर, शयनयान, सामान्य द्वितीय श्रेणी तसेच गार्ड ब्रेकव्हॅनचा समावेश आहे.

पुणे–नागपूर साप्ताहिक एसी विशेष

पुणे–नागपूर साप्ताहिक एसी विशेष (४ फेऱ्या) गाडी २४ फेब्रुवारी व ३ मार्च रोजी दर मंगळवारी दुपारी १५.५० वाजता पुण्याहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.३० वाजता नागपूरला पोहोचेल. परतीची गाडी ही २५ फेब्रुवारी व ४ मार्च रोजी सकाळी ०८.०० वाजता नागपूरहून सुटेल.

पुणे–नागपूर साप्ताहिक विशेष

तसेच पुणे–नागपूर साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या) गाडी अनुक्रमे २५ फेब्रुवारी/४ मार्च आणि २६ फेब्रुवारी/५ मार्च रोजी धावतील. उरळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, धामणगाव व वर्धा हे थांबे निश्चित करण्यात आले आहेत.

प्रवाशांनी अधिकृत संकेतस्थळ किंवा आरक्षण केंद्रांमार्फत आगाऊ आरक्षण करूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.