यवतमाळ: महाराष्ट्रात होळी आणि धुलीवंदनाचा सण उत्साहात साजरा होत असताना जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील म्हसोला (कान्होबा) येथील ऐतिहासिक ‘कान्होबा’ यात्रा हे विदर्भातील श्रद्धेचे आणि परंपरेचे मोठे केंद्र ठरले आहे. म्हसोला येथील यात्रेच्या निमित्ताने ग्रामीण भागात आजही होळीतील जुन्या प्रथा आणि खेळांचे अस्तित्व टिकून असल्याचे दिसते.

म्हसोला (कान्होबा) येथील यात्रेस १०० पेक्षाही अधिक वर्षांची परंपरा आहे. होळीच्या मुहूर्तावर भरणाऱ्या यात्रेची आख्यायिका सर्वत्र प्रसिद्ध आहे. म्हसोला नजीक पांगरी शिवारात कान्होबा टेकडीवर कानिफनाथ महाराजांची समाधी होती. तेथे एक भक्त नित्यनेमाने पूजा करायचा. मात्र ते ठिकाण जंगलात असल्याने त्या भक्ताने कानिफनाथ महाराजांना गावात येण्याची विनंती केली. ती त्यांनी मान्य केली व इप्सित स्थळ येईपर्यंत मागे वळून बघायचे नाही, अशी अट घातली. मात्र म्हसोला गावाच्या वेशीवरच भक्ताने मागे वळून पाहिले आणि कानिफनाथ महाराज तेथेच अंतर्ज्ञान पावले. या ठिकाणी एक सुंदर तळे होते. त्याच ठिकाणी नंतर भक्तांनी कानिफनाथ महाराजांची समाधी बांधली. ती समाधी ‘मजार’सारखी भासत असल्याने तेथे मुस्लीम समुदायसुद्धा येवू लागला.

धार्मिक विवाद होवू नये म्हणून नंतर गावकऱ्यांनी या ठिकाणी मंदिर बांधून, जयपूर येथून कृष्णाची सुंदर मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा केली. गावात ही समाधी कोणत्या काळापासून आहे, यात्रा कधीपासून भरते याची अचूक माहिती गावकऱ्यांनासुद्धा नाही.

होळीच्या आधी येणाऱ्या आमलिका एकादशीनिमित्त म्हसोला येथे कान्होबाची यात्रा भरते. दशमीला काठ्या बसतात; अर्थात उंच काठ्यांना विविधरंगी पताका लावून या काठ्या फिरवल्या जातात. कान्होबाची हळद लावून पूजा केली जातो. बारशीला दहिहांडी व काला होतो. हा कालाही हांड्यातून थेट भक्तांच्या ओंजळीत फेकण्याची प्रथा येथे आहे. त्यांनतर होळीच्या पूर्वसंध्येला यात्रा भरते. कान्होबा (भगवान श्रीकृष्ण) हे येथील ग्रामदैवत असून, या यात्रेत विदर्भ आणि लगतच्या तेलंगणातूनही मोठ्या संख्येने भाविक येतात. यात्रेच्या काळात पूर्वी कुस्त्यांचे फड, तमाशा, टुरिंक टॉकीज अशी भन्नाट मनोरंजनाची साधनं असायची. दोन दिवस आणि दोन रात्री ही यात्रा चालायची.

होळीच्या आदल्या रात्री म्हसोला गावातील यात्रेत पाय ठेवायलाही जागा नसते. ‘कान्होबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. होळीच्या दिवशी होळी पूजन आणि दहनानंतर यात्रा संपते. आज रविवारी म्हसोला येथे मोठी यात्रा भरली असून, उद्या सोमवारी रात्रीपर्यंत ही यात्रा राहणार आहे. म्हसोलासारख्या यात्रा आणि गाठी, शेणाच्या चकोल्या यासारख्या छोट्या पण अर्थपूर्ण परंपराच आपल्या संस्कृतीचा कणा आहेत. वाढत्या शहरीकरणात या ग्रामीण खेळांचे आणि निसर्गस्नेही सणांचे महत्त्व जोपासले जावे म्हणून अनेक कुटुंबीय या काळात गावात येवून राहतात, असे येथील ग्रामस्थ योगेश कडव यांनी सांगितले.

होळीत शेणाच्या चकोल्या, गाठी, पळसफुले

होळीच्या दिवशी लहान मुलांना साखरेच्या ‘गाठी’ देण्याची प्रथा विदर्भात आवर्जून पाळली जाते. ही केवळ खाऊ देण्याची पद्धत नसून त्यामागे एक महत्त्वाचा आरोग्यदायी आणि सांस्कृतिक उद्देश आहे. होळीच्या वेळी ऋतू बदलत असतो, थंडी संपून उन्हाळा सुरू होतो. या बदलाच्या काळात लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती टिकून राहावी आणि त्यांना ऊर्जा मिळावी, यासाठी साखरेची माळ (गाठी) त्यांना घातली जाते. विदर्भाच्या जंगलात मोठ्या प्रमाणात आढळणारी पळसाची फुले होळीच्या रंगांचा मुख्य स्त्रोत आहेत. पूर्वी ग्रामीण भागात पळसाच्या फुलांचे पाणी करून धुलीवंदन खेळले जायचे. तसेच, घरोघरी बनवलेल्या शेणाच्या चाकोल्यांच्या माळा होळीत अर्पण करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.