बाजारमूल्याच्या दरात वाढ; एक टक्का मेट्रो अधिभारही लागू

नागपूर : नागपूर, मेट्रोरिजनमध्ये घर, फ्लॅट, जमीन खरेदी महागणार आहे. राज्य शासनाने जमिनीच्या बाजारमूल्यात नागपूर शहरात ३.३८ टक्के तर एनएमआरडीए क्षेत्रात ३.२० टक्के वाढ केली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील वाढ ही ३.२९ टक्के इतकी आहे. शिवाय महापालिका हद्दीत शुक्रवारपासून १ टक्का मेट्रोचा अधिभारही लागू होणार आहे.

जमिनीच्या बाजारमूल्यांचे सुधारित दर राज्य शासनाने ३१ मार्चला जाहीर केले असून १ एप्रिलपासून ते लागू  होणार आहेत. त्यानुसार जिल्ह्याची बाजारमूल्यातील वाढ ही ३.२९ टक्के असून शहरात ती ३.३८ तर एनएमआरडीए क्षेत्रात ३.२० टक्के आहे. दोन वर्षांपासून मेट्रोचा १ टक्का अधिभार रद्द करण्यात आला होता. आता १ एप्रिल २०२२ पासून हा अधिभारही पुन्हा लागू करण्यात आला आहे. 

बाजारमूल्याच्या वार्षिक दरवाढीसाठी संबंधित शहरातील, ग्रामीण भागातील रियल इस्टेट क्षेत्रातील उलाढालीचा विचार केला जातो. त्यानुसार नगररचना विभागाकडून दरवाढीची शिफारस केली जाते. गेल्या काही वर्षांपासून जमिनीच्या किमती वाढण्याचा कल कायम आहे. चालू आर्थिक वर्षांत फेब्रुवारी २०२२ अखेपर्यंत ६५,५१२ मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांची नोंद झाली. मागील वर्षांत (फेब्रुवारी २०२१) याच काळात हा आकडा ७२,५३९ इतका होता.  दस्तनोंदणीची संख्या कमी होऊनही मुद्रांकापासून मिळणाऱ्या शुल्कात वाढ झाली होती. या वर्षांत ६८७ कोटी रुपये मुद्रांक शुल्क मिळाले होते. मागील वर्षी हा आकडा ५९४ कोटी रुपये होता. बांधकाम व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील रिअल इस्टेटच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. वर्षभरात झालेल्या दस्त नोंदणीची संख्या ही या क्षेत्रात तेजीचा कल दर्शवते. अशा काळात बाजारमूल्यातील वाढ या क्षेत्रावर परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे.

दूरगामी परिणाम

बाजारमूल्याच्या वार्षिक दरवाढीचा फटका फक्त जमीन खरेदी किंवा फ्लॅट खरेदीलाच बसत नाही तर मालमत्ता कर व इतर कराची आकारणीही याच दरानुसार केली जाते. अनेक भागात बाजारमूल्यापेक्षा प्रत्यक्षात जमिनीचे दर कमी असतात, मात्र मुद्रांक शुल्क बाजारमूल्यानुसारच द्यावे लागते. या दरवाढीचे दूरगामी परिणाम होतात.

– तेजिंदरसिंग रेणू,

बांधकाम व्यावसायिक.