शहरातील ‘पॉप्युलर फ्रॅंट ऑफ इंडिया’ या प्रतिबंधित संघटनेच्या ७ पदाधिकाऱ्यांच्या घरांची आज एका विशेष पथकाने झडती घेतली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी एस. रामामुर्ती यांच्या आदेशावरून पोलीस व महसूल विभागाने आज मंगळवारी (दि. ४) ही कारवाई केली.या कारवाईबद्दल कमालीची गुप्तता बाळगण्यात आली. जिल्हाध्यक्ष मौलाना शेख राईस (कमेला परिसर), इखलास खान समीर खान (जोहर नगर) यांच्यासह ७ जणांच्या घरांची झडती घेण्यात आली. त्यांचा देशविघातक कृत्यात सहभाग आहे का? याची चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांना पंचनामा अहवालही देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा >>> बुलढाणा : पांगरीचा झेंडू परराज्यात, दसऱ्यानिमित्त १०० क्विंटलची निर्यात!

केंद्र शासनाने ‘पीएफआय’ वर पाच वर्षासाठी बंदी आणली आहे. यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकारी एस रामामुर्ती यांना प्राप्त झाले. त्यांच्या आदेशाने आज बुलढाणा शहरात ही कारवाई करण्यात आली. चौकशी पथकात उपविभागीय अधिकारी (महसूल) राजेश्वर हांडे, शहर पोलीस ठाणेदार प्रल्हाद काटकर व कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांचा समावेश होता.

हेही वाचा >>> शहरातील रस्त्यांवर बांधकाम साहित्याचे ढिगारे; अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा

काहीच आक्षेपार्ह सापडले नाही : मौलाना रईस शेख
या कारवाईत कोणतीही आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली नसल्याचा दावा जिल्हाध्यक्ष मौलाना राईस शेख यांनी केला आहे. ही कारवाई सरकारचा ‘राजकीय अजेंडा’ असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. चौकशीदरम्यान काही प्रश्न विचारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दोघांना घेतले होते ताब्यात
बुलढाणा शहरातून पीएफआयच्या दोन कार्यकर्त्यांना आठवडाभरापूर्वी ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना कसून चौकशीअंती सोडून देण्यात आले होते. ‘एटीएस’च्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी ही कारवाई केली होती. या कारवाईच्या निषेधार्थ शहर पोलीस ठाण्यासमोरील बुलढाणा-चिखली महावर्गावर रस्ता रोको करणाऱ्या ११ जणांविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई केली होती. त्यात मौलाना रईस यांचाही समावेश होता, हे येथे उल्लेखनीय.