नागपूर: उपराजधानीत डेंग्यू, चिकनगुनियावर नियंत्रणासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ६ लाख ४४ हजार घरांची तपासणी केली गेली. त्यात १७ हजार घरातील कुंड्या, ८ हजारांवर ड्रम आणि इतरही हजारो भांड्यात डासांच्या लाखो अळ्या आढळल्या. नागपूर शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा वाढता प्रसार रोखण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून दहाही झोनमध्ये रुग्णांचे सर्व्हेक्षण व तपासणी केली जात आहे. त्यानुसार आतापर्यंत ६ लाख ४४ हजार ०४६ घरांची तपासणी झाली. आशा स्वयंसेविका घरोघरी भेट देऊन तापाच्या रुग्णांची माहिती घेत आहेत.
सोमवारपर्यंत (२६ ऑगस्ट) १ हजार ६७७ कुलर, ३ हजार ५३८ टायर, १६ हजार ९९३ कुंड्या, ८ हजार १७९ ड्रम, ३ हजार १७८ मडके, २ हजार ७०३ पक्षी व प्राण्यांची भांडी आणि ५ हजार ५९० इतर भांड्यांमध्ये डेंग्यूच्या अळया आढळून आल्या. औषध टाकून ते नष्ट केले गेले. शिवाय घरात आणि परिसरात पाणी जमा राहणाऱ्या वस्तूंची पाहणी केली जात आहे. परंतु, आताही हजारो घरात डास अळ्या असल्याने आजारांवर नियंत्रण मिळणार कसे, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी लक्ष्मीनगर झोन कार्यालयाला सोमवारी भेट देत परिसराची पाहणी केली. यावेळी डेंग्यू व चिकनगुनिया नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाय योजनांसह परिसराची नियमित स्वच्छता आणि धूर फवारणी यासंदर्भात माहिती जाणून घेतली. त्यानंतर गोयल यांनी ही माहिती महापालिका आयुक्तांना दिली. याप्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, डॉ. सुनील कांबळे उपस्थित होते.
हेही वाचा >>>राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…
नागपूर शहरातील सगळ्याच भागात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने डेंग्यू व चिकनगुनियाचे रुग्ण वाढत आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यात नागपूर महापालिकेचा आरोग्य विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वत्र कीटकनाशक फवारणीचा दावा होत असला तरी सर्वत्र डासांचा त्रास वाढतच असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
“ शहरात डास नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु नागरिकांनीही घरी आणि परिसरात डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ नये यासाठी स्वच्छतेची काळजी घ्यावी. डेंग्यूची अळी पाण्यात वाढत असल्यामुळे कुठेही पाणी जमा होऊ देऊ नये. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. आजाराचे एकही लक्षण दिसतात तातडीने उपचार घ्यावा.” – डॉ. अभिजीत चौधरी, आयुक्त, महापालिका.