प्रेमप्रकरणातून घर सोडणे, प्रियकराकडून फसवणूक होणे यासह इतरही अनेक कारणांमुळे विदर्भासह इतरही भागातून मुली येथील देहविक्री करणाऱ्या वस्तीत (गंगा जमुना) येतात व तेथेच थांबतात. त्यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वाईट असतो, परंतु यालाही काही अपवाद आहेत. की जण या मुलींच्या अडचणी समजून घेतात व त्यांच्याशी विवाह करून संसारही थाटतात. बदनाम वस्तीतील एका ‘कमला’ची कथाही काहीशी अशीच आहे.

वर्धा जिल्ह्य़ातील एका शेतकरी कुटुंबातील कमलाने (बदललेले नाव) पंधरा वर्षांची असताना प्रेमप्रकरणातून घर सोडले. २६ जून १९९६ ला एका मंदिरात लग्न केले. तीनच दिवसाने पतीला पोलिसांनी अटक केल्याने कमला निराधार झाली. ती पतीच्या नातेवाईकांकडे एका गावात जाऊन राहू लागली. एक दिवस ती पतीला भेटण्यासाठी नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात आली. गावी परत जाताना बस सुटली. रात्री बसस्थानकावर तिच्या असहाय्यतेचा फायदा ऑटोचालकाने घेतला. त्याने कमलाला गंगा जमुना परिसरात आणले. तेव्हापासून ती देहविक्री व्यवसायात शिरली.

तेथे एका तरुणासोबत राहू लागली. त्यापासून तिला एक अपत्यही झाले. तोही त्रास द्यायला लागल्याने तिने धुळे गाठले. तेथे तिची ओळख नैराश्यात असलेल्या एका शिक्षकासोबत झाली. दोघांमध्ये प्रेम झाले. ती पुन्हा नागपूरला परतली. तोही तिच्या भेटीला नागपुरात येऊ लागला. रेडक्रॉस संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक हेमलता लोहवे यांना ही बाब कळली. त्यांनी दोघांना लग्नाचा सल्ला दिला. सध्या दोघेही मध्यप्रदेशात संयुक्त कुटुंबात आनंददायी आयुष्य जगत आहेत. पत्नीला त्रास होऊ नये म्हणून त्याने घरच्यांना तिची खरी ओळख सांगितली नाही. अशाच पद्धतीने गंगा जमुनातील इतरही पाच मुलींचे लग्न झाले.

तिच्या मुलाला त्याचे नाव

कमलाला एक दहा वर्षांचा मुलगा आहे. तिच्या दुसऱ्या पतीने (शिक्षकाने) त्याला स्वत:चे नाव दिले. चांगल्या शाळेत प्रवेश दिला. एवढेच नव्हे तर कमलावर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून दोघांनी पुन्हा अपत्य नको असा निर्णय घेतला.