गोंदिया : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या उंबरठ्यावरच रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी अडचण उभी ठाकली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाअंतर्गत गोंदिया स्थानकावर सुरू होणाऱ्या दुरुस्ती कामांमुळे हावडा–मुंबई या महत्त्वाच्या मार्गावरील अनेक एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्या तब्बल २० दिवस रद्द करण्यात येणार आहेत. ५ एप्रिल ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या या ब्लॉकमुळे हजारो प्रवाशांच्या प्रवासाचे गणितच बिघडणार आहे.
गोंदिया ब्लॉकचा फटका
गोंदिया स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वरील वॉशेबल एप्रन हटवून त्याऐवजी बॅलस्टेड ट्रॅक बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. भविष्यातील सुरक्षितता, गाड्यांचा वेग आणि प्रवाशांच्या सोयीसाठी हे काम अत्यावश्यक मानले जात असले, तरी त्यासाठी प्रवासी वाहतूक पूर्णतः बंद ठेवावी लागणार आहे. परिणामी, रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होऊन अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
या गाड्यांच्या फेऱ्या रद्द
१. शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
२. कोरबा-अमृतसर एक्स्प्रेस
३. अमृतसर-बिलासपूर एक्स्प्रेस
४. हजरत निजामुद्दीन-रायगड एक्स्प्रेस
५. विशाखापट्टणम-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस
५ एप्रिल ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध तारखांना या गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्याने लांब पल्ल्याच्या प्रवाशांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागणार आहे.
या पॅसेंजर गाड्यांमध्ये अंशतः बदल
१. गोंदिया-चांदाफोर्ट मार्गावरील स्थानिक मेमू व डेमू
२. बल्लारशा-गोंदिया पॅसेंजर
३. गोंदिया-कटंगी पॅसेंजर
४. काही गाड्या हिरडामली स्थानकापर्यंतच
याशिवाय, ५ ते २५ एप्रिलदरम्यान वरील काही गाड्या अंशतः रद्द किंवा बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्याव्यतिरिक्तच्या प्रवासासाठी बस किंवा अन्य पर्यायांचा आधार घ्यावा लागणार आहे.
प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार
या निर्णयामुळे रोजच्या प्रवासावर अवलंबून असणाऱ्या कामगार, शासकीय कर्मचाऱ्यांना,विद्यार्थी आणि व्यावसायिक वर्गाला मोठा फटका बसणार आहे. आधीच उन्हाळ्याच्या दिवसांत रेल्वे तिकिटांची टंचाई जाणवत असताना, गाड्या रद्द झाल्याने बससेवा आणि खासगी वाहनांवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. परिणामी, प्रवाशांच्या खिशावरही अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.
रेल्वे प्रशासनाने या कामाचे महत्त्व अधोरेखित करताना, “दीर्घकालीन सोयीसाठी ही तात्पुरती गैरसोय सहन करावी लागेल,” असे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, प्रवाशांच्या दैनंदिन जीवनात निर्माण होणारी अडचण, अनिश्चितता आणि वाढलेला प्रवासाचा खर्च या गोष्टींमुळे असंतोष व्यक्त होत आहे.
एकीकडे प्रगतीच्या रुळांवर वेग वाढवण्याचा प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे या तात्पुरत्या अडथळ्यामुळे प्रवाशांचा प्रवास मात्र कष्टप्रद ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर, रेल्वे प्रशासनाने पर्यायी व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज असल्याची मागणीही पुढे येत आहे.
