हुडकेश्वर पोलिसांकडून आरोपींना अटक; प्रिटिंग प्रेस मालकाच्या हत्येचा गुंता सुटला

अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्याने त्याचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच  पोलीस कर्मचारी असलेल्या प्रियकराची मदत घेतली. भाडोत्री गुंडाला तीन लाख रुपयांची सुपारी देऊन पतीची हत्या केली.  एखाद्या चित्रपटातील प्रसंग वाटावा असा हा धक्कादायक प्रकार प्रिटींग प्रेस मालकाच्या खुनाच्या तपासात निष्पन्न झाला. पोलिसांनी पत्नीसह चौघांना अटक केली असून त्यांना ५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संजय धनराज चव्हाण (३५) रा.गणेश अपार्टमेंट, श्रीरामनगर, दिघोरी असे मृत इसमाचे नाव आहे. त्यांची पत्नी स्नेहा संजय चव्हाण (२७) रा. गणेश अपार्टमेंट, दिघोरी, तिचा  प्रियकर योगेश पुरुषोत्तम गहाने (२७) रा. गणेश अपार्टमेंट, दिघोरी, प्रकाश चंद्रशेखर जवादे (२६) रा. चंद्रनगर, जुनी पारडी व आकाश ऊ र्फ बिट्ट ओमप्रकाश सोमकुंवर (२८) रा. कुशीनगर, जरीपटका अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. योगेश हा स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे.

संजय व योगेश एकाच अपार्टमेंटमध्ये राहात होते. त्यांची मैत्री होती. कौटुंबिक वादातून संजय हा पत्नी स्नेहाला अनेकदा मारहाण करायचा. त्यावेळी योगेश तिच्याविषयी सहानुभूती दाखवायचा. यातून २०१७ मध्ये योगेश व स्नेहा यांच्यात अनैतिक संबंध प्रस्तापित झाले.

दरम्यान, संजयला दारूचे व्यसन आहे, तो नियमित मला मारहाण करतो, त्यामुळे त्याच्यासोबत राहायचे नाही, असे स्नेहा ही योगेशला सांगत होती. त्यातूनच जानेवारी महिन्यात योगेशने संजयचा काटा काढण्याची योजना आखली. हे करताना त्याने स्नेहालाही विश्वासात घेतले.  तिनेही त्याला होकार दिला. यासाठी योगेशने पोलीस खात्यातील  मित्र प्रकाशची मदत घेतली. प्रकाशने गुन्हेगार बिट्टची भेट योगेशसोबत घालून दिली. बिट्टने संजयच्या हत्येसाठी तीन लाख रुपयांची सुपारी घेतली. योगेशने ३० हजार रुपये आगाऊ दिले. त्यानंतर बिट्ट व योगेश संधीची वाट बघत होते. मंगळवारी योगेशने संजयला पार्टीला जायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार संजयने मित्रांसोबत पार्टीला जात असल्याचे घरी सांगितले. ठरल्यानुसार  संजय, योगेश व प्रकाश हे विहीरगावजवळील आऊ टर रिंग रोडवरील हायलॅण्ड  ढाब्यावर गेले. तेथे मद्यप्राशन केले. यावेळी बिट्ट व त्याचे तीन साथीदारही ढाब्यावर होते. जेवण केल्यानंतर  योगेश व संजय एका मोपेडवर तर प्रकाश हा मोटारसायकलने निघाले. ओरिएंटल कंपनीनजीकच्या नाल्याजवळ शौचालयाच्या बहाण्याने योगेशने गाडी थांबवली. याचवेळी बिट्ट व त्याचे साथीदार कारने तेथे पोहोचले. त्यांनी धारदार शस्त्रांनी संजय यांच्या डोक्यावर वार केले. नंतर जडवस्तूने डोके ठेचले. मृतदेह नाल्याजवळ फेकून सर्व पसार झाले.

एका ट्रकचालकाला संजयचा मृतदेह दिसला. त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन, यांच्या मार्गदर्शनाखाली हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक विजय नाईक, सत्यवान कदम, शुभांगी मोहारे, मनोज नेवारे, परेश, नीलेश, ललित, राजेश संतशेष, चंद्रशेखर  यांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू केला.

असा लागला छडा

ढाब्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चलचित्रात योगेश हा संजयसोबत दिसून आला. पोलिसांनी योगेशला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर  त्याने प्रकाश व बिट्टच्या मदतीने संजयची हत्या केल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी, स्नेहाला ताब्यात घेतले. प्रकाश हा ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असून तो सध्या वर्धेतील फायरिंग रेंजमध्ये सराव करीत होता. ग्रामीण पोलिसांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले, तर बिट्टला जरीपटका भागातून अटक केली. चौघांनाही गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दागिने विकून पैसे देणार होती

संजयचा काटा काढल्यानंतर अपघाताचा देखावा करण्यात आला. पोलिसांनी अपघाताची नोंद केली असती. प्रकरण शांत झाले असते. काही दिवसांनी स्नेहा ही दागिने विकून योगेशला उर्वरित रक्कम देणार होती. सुपारीचे टोकन देण्यासाठी योगेशने मित्राकडून ३० हजार रुपये उधार घेतले होते. त्याचे वडील शिक्षक असून आई गृहिणी आहे.