अमरावती: जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील सागर कापूस कारखान्यामध्ये मंगळवारी सकाळी लागलेल्या आगीत कोट्यवधींचे ‘पांढरे सोने’ जळून खाक झाले. आगीचे कारण कळू शकले नसले, तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय आहे. या दुर्घटनेत सुमारे ७ ते ८ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस साठ्यालाही या आगीचा मोठा फटका बसलाा आहे. सुदैवाने या आगीत प्राणहानी झालेली नाही.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार राठी कुटुंबीयांच्या मालकीच्या सागर कॉटन इंडस्ट्रीमध्ये सकाळी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना अचानक धुराचे लोट दिसू लागले. उघड्यावर ठेवलेला कापूस आणि वाऱ्याचा वेग यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्र रुप धारण केले. पाहता पाहता संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा पसरल्या आणि आकाशात धुराचे काळे साम्राज्य पसरले.
नुकसान किती झाले?
या आगीत मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवलेला कापसाच्या गाठी जळून कोळसा झाल्या आहेत. या ठिकाणी अंदाजे १५ हजार क्विंटल कापूस ठेवण्यात आला होता. शिवाय ५० गाड्यांमधील सरकी देखील ठेवण्यात आली होती. या आगीत कापसाच्या ३०० ते ४०० तयार गाठी जळून खाक झाल्यास. याची एकूण किंमत सुमारे ७ ते ८ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे या कारखान्यात ‘सीसीआय’चा कापूस साठवण्यात आला होता. तो देखील या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे.
अग्निशमन दलाची धावाधाव
आगीच्या घटनेची माहिती मिळताच दर्यापूर, अकोट आणि परतवाडा येथून अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यास. अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. अनेक तास ही आग धुमसत होती. अंजनगाव नगरपालिकेची अग्निशमन गाडी मात्र उशिरा पोहचल्याची चर्चा परिसरात रंगली होती. याबद्दल नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात होते.
प्रशासकीय दखल आणि तपास
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रहिमापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. नगराध्यक्ष अविनाश गायगोले, आरोग्य सभापती प्रवीण नेमाडे आणि कापूस कारखानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पंचनामा करण्याचे काम सुरू असून या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
