लांडग्याच्या रूपाने मेळघाटात नवा मानव-वन्यजीव संघर्ष ; एक मृत्युमुखी, ३० नागरिक जखमी

मेळघाटात मानव-वन्यजीव संघर्ष इतर वन्यजीव क्षेत्राच्या तुलनेत बराच कमी आहे

वनखात्याने सध्या पाच-पाच कर्मचाऱ्यांच्या दहा चमू तयार केल्या आहेत. त्या गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासोबतच लांडग्याचा शोध घेत आहेत. प्रामुख्याने कोरकू, आदिवासी गावात दवंडी देण्याचे काम सुरू आहे. मात्र, ना वनखात्याच्या चमूला लांडगा सापडला, ना गावकऱ्यांना. त्यामुळे वनखात्यासमोरील आव्हान वाढले आहे.

नागपूर : लांडग्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी झाली आहे. जगभरात आढळणाऱ्या लांडग्याच्या ३७ प्रजातींपैकी केवळ एक प्रजाती भारतात आहे. त्यातही महाराष्ट्र, कर्नाटक, आंधप्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, हरियाणा हे सर्व राज्य मिळून केवळ दोन ते तीन हजार लांडगे शिल्लक आहेत. असे असतानाही मेळघाट परिसरात लांडग्याच्या रूपाने वेगळा मानव-वन्यजीव संघर्ष सुरू झाला आहे.

मेळघाट आणि मेळघाटच्या परिसरात ३०९ गावे आहेत. मेळघाटात मानव-वन्यजीव संघर्ष इतर वन्यजीव क्षेत्राच्या तुलनेत बराच कमी आहे. चंद्रपूर, ब्रम्हपुरी परिसरात वाघ आणि माणूस असा संघर्ष पेटला असताना मेळघाटात हा संघर्ष नाही.  मात्र, लांडग्याच्या रूपाने वेगळा मानव-वन्यजीव संघर्ष येथे दिसून येत आहे. लांडग्याचा अधिवास कमी होत असताना येणाऱ्या काळात संघर्षांचे मोठे आव्हान असणार आहे. कारण या प्राण्यांच्या बाबतीत फारसे संशोधन समोर आलेले नाही. लांडगा आणि माणूस यांचा संघर्ष होत नाही, पण रेबीज झाला असेल तर तो माणसावर हल्ला करू शकतो. मेळघाटची घटना दुर्मिळ आहे. या नव्या संघर्षांसोबत जंगलातील इतर प्राण्यांना या रोगापासून वाचवण्याचे आव्हान देखील वनखात्यासमोर आहे. सुमारे एक महिन्यापासून मेळघाटातील धारणीलगतचे इमली, मेळघाटातील बारुखेडा, प्रादेशिक तसेच सीमा भागात हा धुमाकूळ सुरू आहे. विशेष व्याघ्र संरक्षण दलातील जवानाच्या वडिलांना रेबीज झालेल्या लांडग्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडावे लागले.  सुमारे ३० नागरिक जखमी झाले आहेत. या लांडग्याला मारले तरी पुन्हा दुसऱ्या लांडग्याचा नागरिकांवर हल्ला सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिक दहशतीत असण्यासोबतच इतर वन्यप्राण्यांना देखील हा आजार होण्याची शक्यता आहे. 

नागिरकांनी अफवा व अंधश्रद्धा यावर विश्वास ठेवू नये. वनविभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.  रेस्क्यू करण्याचे आदेश वनविभागाने दिले आहेत. चार वनपरिक्षेत्र अधिकारी व संपूर्ण चमू प्रभावित भागात गस्त करत आहे. तसेच स्थानिक भाषेत दवंडी देऊन गावांमध्ये जनजागृती सुरू आहे. जखमी रुग्णांची भेट घेतली, त्यांच्यावर योग्य  उपचार सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे.

– यादव तरटे पाटील, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Human wolf conflict seen in melghat zws

ताज्या बातम्या