लोकसत्ता टीम

नागपूर : वैद्याकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेमध्ये (नीट) काही विद्यार्थ्यांना दिलेल्या वाढीव गुणांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय शिक्षण विभागाने चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) १५०० हून अधिक विद्यार्थ्यांना वाढीव (ग्रेस) गुण दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आता नागपूरमध्ये असलेल्या ‘फीट जी’ या शिवकणी वर्गाच्या विरोधात शेकडो पालक रस्त्यावर उतरले होते. जेईईच्या शिकवणीसाठी ‘फीट जी’च्या संचालकाने पालकांकडून लाखो रुपये घेतले. मात्र, चार महिन्यांपासून विद्यार्थ्यांना नियमित शिकवणी दिली जात नसल्याचा आरोप पालकांनी केला. याविरोधात लॉ कॉलेज चौकातील ‘फीट जी’च्या शिकवणी वर्गासमोर दुपारी शेकडो पालक आणि विद्यार्थी जमा झाले होते. यावेळी त्यांनी शिकवणी वर्गाच्या विरोधात घोषणा दिल्या.

एक पालकाने सांगितले की, त्यांच्या मुलाचे हे बारावीचे वर्ष आहे. एका वर्षाआधी शिकवणीसाठी दोन लाख रुपये जमा केले होते. यावेळी उत्तम शिक्षकांकडून शिकवणी मिळेल असे सांगण्यात आले होते. मात्र, चार महिन्यांपासून मुलांना शिकवणी दिली जात नाही. विद्यार्थी सकाळी सात वाजता शिकवणीमध्ये येतात. मात्र, त्यानंतर सर्व वर्ग होत नाही. येथील अनेक चांगले शिक्षक सोडून गेले आहेत. त्यांच्या ऐवजी नवीन शिक्षक आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. यासंदर्भात अनेकदा तक्रार करूनही शिकवणी वर्गाने याची दखल न घेतल्याने आम्ही रस्त्यावर उतरल्याचे पालक म्हणाले.

आणखी वाचा-मोदींच्या शपथविधीनंतर उद्या होणाऱ्या सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या भाषणाकडे लक्ष

नीटचा गोंधळ काय?

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या ‘नीट’ सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होताच देशभर वाद निर्माण झाला आहे. २०२३ मध्ये केवळ दोन विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले असताना यंदा त्यात भर पडून तब्बल ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले असून ‘पात्रता गुणां’मध्ये (कट ऑफ) प्रचंड वाढ झाली. ७०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला थेट दोन हजारांच्या जवळपास ‘रँक’ मिळणार आहे. यंदा अचानक गुणांमध्ये तफावत दिसून येत असल्याने विद्यार्थी, पालकांकडून परीक्षा घेणाऱ्या ‘एनटीए’वर शंका उपस्थित केली जात आहे. काही पालकांनी निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णयही घेतला आहे.

आणखी वाचा-खळबळजनक! बोगस बियाणे साठा पकडला, एकास अटक

‘नीट’ परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकाराची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने शुक्रवारी केली होती. आम आदमी पक्षानेही या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली. या निकालामुळे राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र सरकारने ही परीक्षा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) या विद्यार्थी संघटनेने सीबीआय चौकशीची मागणी केली. राजकीय पक्ष व विविध संघटनांकडून होत असलेल्या आरोपानंतर शनिवारी केंद्रीय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या वाढीव गुणांचे पुनर्मूल्याकंन करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती ‘एनटीए’चे महासंचालक सुबोध कुमार सिंह यांनी दिली.