scorecardresearch

उपराजधानीत मिळतात शंभर प्रकारच्या इडली, काळ्या इडलीचे आकर्षण ; खवय्यांसाठी पर्वणी, समाजमाध्यमावरही चर्चा

रेड्डींनी विकसित केलेली काळी इडली नागपुरात ‘चारकोल इडली’ या नावाने प्रसिद्ध आहे.

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : मुळात दाक्षिणात्य खाद्यपदार्थ असलेली इडली सर्वत्र लोकप्रिय आहे, नागपूर हे त्याला अपवाद नाही. शहरात फक्त पारंपरिक पांढऱ्या रंगाचीच इडली उपलब्ध नाही तर त्याचे शेकडो प्रकार पाहून खाणाराही अचंबित व्हावा. येथील कुमार अण्णा रेड्डी या प्रयोगशील इडलीप्रेमीने चक्क काळय़ा इडलीसह शंभर वेगवेगळय़ा प्रकारच्या इडली विकसित केल्या आहेत. याचा स्वाद घेण्यासाठी रोज सकाळी नागपूरकर गर्दी करत असून समाज माध्यांवरही या नाविन्यपूर्ण इडलींची चांगलीच चर्चा आहे.

इडली म्हटले की डोळय़ापुढे येते ती पांढऱ्या रंगाची गोल इडली. मात्र रेड्डींनी विकसित केलेली काळी इडली नागपुरात ‘चारकोल इडली’ या नावाने प्रसिद्ध आहे. केवळ हीच नव्हे

तर इतरही अनेक प्रकार त्यांनी विकसित केले आहेत. यात काळी पिवळी इडली, चॉकलेट इडली, तिरंगी इडली, आणि तीन किलो वजनाची इडलीचा समावेश आहे. रेड्डी यांचे येथील सिव्हिल लाईन्स परिसरात वॉकर स्ट्रीट आणि कदीम बाग नर्सरी जवळ  ‘ऑल अबाऊट इडली’ नावाने स्टॉल लावतात. पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंतच येथे  इडलीचा आस्वाद घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होते. रेड्डी यांनी ग्राहकांचे ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ग्रुप तयार केले. रोज त्यावर ते दुसऱ्या दिवशीचा ‘मेनू’ टाकतात. त्यानुसार खवय्ये त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांच्याकडे गर्दी करतात. विशेष म्हणजे, रेड्डी त्यांच्याकडी सर्व इडलींची नियमितपणे अन्न प्रयोगशाळेत तपासणीही करून घेतात. असा हा आगळा वेगळा इडली विक्रेता सध्या नागपूरकरांच्या आकर्षणाचा केंद्रिबदू ठरला आहे.

काळी-पिवळी टॅक्सी इडली

रेड्डी यांच्या दुकानात ‘काळी-पिवळी ट्रॅक्सी इडली’ ग्राहकांचे आकर्षण ठरली आहे. तसेच चॉकलेट इडली, समोसा इडली, विविध धान्यांपासून तयार केलेल्या इडली, मिक्स व्हेज इडली, चिज इडली, मिनी मसाला इडली, पिझ्झा इडलीसह इतरही प्रकार उपलब्ध आहे.

अशी तयार होते काळी इडली

रेड्डी यांच्याकडील काळी इडली प्रसिद्ध आहे. रवा, नारळ, संत्र्याची साल, बीट रूटचा वापरून ही इडली तयार केली जाते. नारळामुळे ती इतर इडल्यांपेक्षा वेगळी व चविष्ट होते.

सांबारऐवजी चटणी

ऑल फॉर इडली या स्टॉलचे वैशिष्टय़ म्हणजे इडलीसोबत कधीच सांबाराचे आळण दिले जात नाही. त्याऐवजी विविध चटण्यांचा स्वाद ग्राहकांना घेता येतो. रेड्डींच्या मते प्राचीन दाक्षिणात्य पाककलेत इडलीसोबत सांबार देण्याची परंपरा नाही. ती अलीकडील काळात रुजली. पण मी आंध्रातल्या परंपरेप्रमाणेच लोकांना इडली सोबत चटणीच देतो, असे  रेड्डी सांगतात.

कोण आहेत रेड्डी?

कुमार अण्णा रेड्डी यांचे कुटुंब मूळचे आंध्रप्रदेशाचे. पण रेड्डी यांचा जन्म आणि शिक्षण नागपूर जवळच्या कामठीला झाले. पाककलेत निपूण असल्याने त्यांनी बडय़ा हॉटेल्समध्ये गलेलठ्ठ पगारावर काम सुरू केले. कामाचे समाधान नसल्याने त्यांनी नोकरी सोडली. लहानपणापासूनच इडलीची आवड असल्यामुळे त्यांनी २०१६ मध्ये ‘ऑल अबाउट इडली’ या नावाने फिरते विक्री केंद्र सुरू केले. यादरम्यान त्यांनी वेगवेगळय़ा रंगांच्या व आकाराच्या इडली तयार करणे सुरू केले. आजवर त्यांनी इडल्यांचे १०० पेक्षा जास्त प्रकार तयार केले आहेत. त्यांनी तयार केलेल्या ‘काळय़ा इडलीने’ त्यांना खरी ओळख दिली. त्यांच्या ‘मेनू कार्ड’मध्ये इडलीचे शंभराहून अधिक प्रकार असले तरी ते रोज पाच ते सहा प्रकारच्या इडल्या तयार करतात.

पुलवामा हल्यातील शहिदांचे स्मरण कायम राहावे म्हणून संरक्षण दलातील जवान, पोलीस व इतरही सुरक्षा जवानांसाठी तीन किलो वजनाची इडली तयार केली आहे. तिची किंमत ८०० रुपये आहे, पण ती पोलीस व इतर सुरक्षा जवानांना निम्म्या दरात दिली जाते. इतरांकडून मिळालेल्या या इडलीच्या रक्कमेतून निम्मी रक्कम सैन्यदलाताली जवानांना देणगी स्वरूपात दिली जाणार आहे.– कुमार अण्णा रेड्डी, संचालक, ऑल अबाऊट इडली, नागपूर.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hundreds types of idlis sells in nagpur restaurant zws

ताज्या बातम्या