scorecardresearch

नागपूर: काळय़ा बिबटय़ाची शिकार; नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील प्रकार

महाराष्ट्रात काळय़ा बिबटय़ाचे अस्तित्व दुर्मिळ असताना नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प त्याबाबतीत सुदैवी ठरले होते.

black leopard

महाराष्ट्रात काळय़ा बिबटय़ाचे अस्तित्व दुर्मिळ असताना नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प त्याबाबतीत सुदैवी ठरले होते. गेल्या पावणेदोन वर्षांपासून काळय़ा बिबटय़ाने या व्याघ्रप्रकल्पात ठाण मांडले होते. मात्र, व्याघ्रप्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना निसर्गाचे हे देणे सांभाळता आले नाही आणि गावकऱ्यांनीच काळय़ा बिबटय़ाचा बळी घेतला.

जुलै २०२१ मध्ये नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील बफर क्षेत्रात काळय़ा बिबटय़ाच्या अधिवासाचे छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित झाले. डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ बिलाल हबीब यांनी ‘ट्विटर’वर ते प्रसिद्ध केले. त्यानंतर काळय़ा बिबटय़ाच्या आगमनाची वार्ता पसरली. प्रत्यक्षात एप्रिल २०२१ मध्येच व्यवस्थापनाने समाज माध्यमावर ते जाहीर केले आणि लगेच ते काढूनही टाकले. डॉ. बिलाल हबीब यांनी ते छायाचित्र ‘ट्विटर’वर प्रकाशित केल्यानंतर व्याघ्रप्रकल्प व्यवस्थापनाने काळय़ा बिबटय़ाचे अस्तित्व मान्य केले. या दुर्मिळ काळय़ा बिबटय़ाचे येथील वास्तव्य कदाचित काहींना आवडले नाही. त्यांनी फास लावला आणि बिबट फासात अडकला. त्याने स्वत:ला सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. फासात अडकूनही तो मरण पावला नाही म्हणून गावकऱ्यांनी त्याला भाल्याने मारले. १३ जानेवारीलाच ही घटना घडली. तत्पूर्वी १२ जानेवारीला कॅमेरा ट्रॅपमध्ये त्याचे छायाचित्र आढळले होते.

त्याच्या शिकारीची कुणकुण वनरक्षक व स्थानिकांना होती. पण कुणीही अवाक्षर काढले नाही. मात्र, खात्यातीलच एका अधिकाऱ्याने स्वत:चा जीव धोक्यात घालून या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला. त्याच्या या चौकशीमुळे वाघासह इतरही वन्यप्राण्याच्या शिकारीही उघडकीस आल्या. मात्र, त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली नाही. काळय़ा बिबटय़ाच्या शिकारीचे वास्तव वनखात्यातील वरिष्ठ अधिकारी अजूनही मान्य करायला तयार नाहीत. यापूर्वी २०१९ मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प, तर २०२० मध्ये पेंच व्याघ्रप्रकल्पात काळा बिबट आढळला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटातही काळय़ा बिबटय़ाची नोंद आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 01:59 IST