scorecardresearch

तीव्र हवामान बदलामुळे २० टक्के मृत्यू महाराष्ट्रात

मागील वर्षात हवामान बदलाचे सर्वाधिक दुष्परिणाम राज्यात घडून आले.

चक्रीवादळ, अतिवृष्टी, अवकाळी पावसाचा फटका

नागपूर : मागील वर्षात हवामान बदलाचे सर्वाधिक दुष्परिणाम राज्यात घडून आले. भारतात २०२१ मध्ये एक हजार ७५० मृत्यू झाले. त्यातील सर्वाधिक २० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. हवामान बदलाची गती दिवसेंदिवस तीव्र होत असून चक्रीवादळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट यासारख्या घटना सातत्याने घडून येत आहेत. देशभरात तीव्र हवामानबदलामुळे एक हजार ७५० माणसे मृत्युमुखी पडली. यातील ४३ टक्के मृत्यू पुरामुळे तर ४५ टक्के मृत्यू ढगांच्या गडगडाटामुळे आणि वीज पडल्यामुळे झाले. या हवामान बदलाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला. गेल्या काही वर्षात संपूर्ण भारताला अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. २०२१ या वर्षातही या घटना घडल्या.   महाराष्ट्रात त्याचे प्रमाण अधिक होते. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण महाराष्ट्रात ३० पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. चक्रीवादळ आणि गडगडाटी वादळाचा सामना राज्याला करावा लागला. २०२१ मध्ये गुलाब, तकते या चक्रीवादळासह पूर, वीज पडण्याचे प्रमाण अधिक होते. परिणामी, महाराष्ट्रात सुमारे ३५० लोकांना जीव गमवावा लागला. पुरामध्ये सुमारे २१५, ढगांचा गडगडाट आणि वीज पडून ७६, गुलाब आणि तकते चक्रीवादळामुळे ५६ तर थंडीची लाट, धुळीचे वादळ, गारपीट यामुळे तिघांचा मृत्यू झाला. या अभ्यासादरम्यान धोक्याच्या १३ श्रेणींची धोका आणि असुरक्षितता अशा दोन श्रेणीत विभागणी करण्यात आली. यात पूर, गडगडाट आणि वीज, थंडी आणि उष्णतेच्या लाटा यासह सर्व हवामानातील धोके समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, नागरिकांना हवामान बदल धोक्याची सूचना आधीच देता यावी म्हणून हवामानाचा अंदाज घेण्यासाठी भारतीय हवामान खात्याने देशात आणखी चार ठिकाणी रडार लावले.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hurricanes heavy rains unseasonal rains deaths climate change ysh