नागपूर : पती कामावरून घरी आणि त्याने बायकोला जेवण वाढायला सांगितले. टीव्ही मालिका बघण्यात मग्न असलेल्या पत्नीने जेवण वाढले पण त्यात थंड झालेली भाजी दिली. त्यामुळे नवरा चिडला आणि त्याने वाद घातला. वाद विकोपाला गेला आणि नवऱ्याने चक्क गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. बायकोनी आरडाओरड केली. पोलिसांनी लगेच घटनास्थळावर धाव घेतली. नवऱ्याने गळफास घेताच पोलिसांनी त्याचा भार खांद्यावर घेतला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या व्यक्तीचा प्राण वाचला. क्षुल्लक वादातून घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

रात्री साडेआठच्या सुमारास पाचपावली-ठक्करग्राम परिसरात गस्तीवर असताना बिट मार्शल्स पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस नियंत्रण कक्षाचा संदेश आला. लष्करीबाग परिसरात एका महिलेला व मुलाला दारूच्या नशेत पतीने मारहाण केली व दोघांनाही घराबाहेर काढले. पतीने दरवाजा आतून बंद केला होता. बिट मार्शल्स अतूल व मनोज यांनी तातडीने ठाणेदार बाबुराव राऊत यांना घटनेची माहिती दिली. राऊत यांनी तेथे तातडीने प्रफुल्ल व देवेंद्र या दोन कर्मचाऱ्यांना देखील पाठविले. चौघेही बिट मार्शल्स तेथे पोहचल्यानंतर त्यांना दार लावलेले दिसले. त्यांनी लगेच दरवाजा तोडला. घरात अंधार असल्याने त्यांना सुरुवातीला प्रकार लक्षात आला नाही.

हेही वाचा…VIDEO : ‘नयनतारा’ला ‘भोला’ अन् ‘शिवा’ची भीती! शिकार लपवण्यासाठी ‘ति’ने काय केले, एकदा पहाच…

परंतु,उजेड करून पाहणी केली असता महिलेचा पती पंख्याला ओढणीने गळफास लावलेल्या स्थितीत दिसला. प्रफुल्ल व देवेंद्र यांनी धाव घेत त्याचे पाय पकडले तर अतुलने स्टूल घेऊन ओढणी कापली. या प्रकाराने हादरलेल्या पतीला त्यांनी शांत केले. पत्नीने गरम भाजी न देता थंड भाजी दिल्याने संतापात हे पाऊल उचलल्याचे पतीने सांगितले. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी चारही बिट मार्शल्ससह ठाणेदार बाबुराव राऊत यांना कार्यालयात बोलावून त्यांना सन्मानित केले.