scorecardresearch

पत्नीवर कारवाईसाठी पतीचे चक्क उपोषण ;कारण वाचून आश्चर्य वाटेल

पती-पत्नीचं नातं पवित्र असतं. देवा, ब्राह्मणांच्या साक्षीने ते बांधल्या जातं. लग्नानंतर पती-पत्नीच्या संसारात कुरबुरी सुरूच असतात.

पती-पत्नीचं नातं पवित्र असतं. देवा, ब्राह्मणांच्या साक्षीने ते बांधल्या जातं. लग्नानंतर पती-पत्नीच्या संसारात कुरबुरी सुरूच असतात. वादावादीत काही दाम्पत्य अगदी टोक देखील गाठतात. असाच काहीसा प्रकार बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा येथे घडला आहे. पत्नीवर कारवाई करण्यासाठी पतीने चक्क उपोषणाचे हत्यार उपसले. या मागील कारण वाचून आपल्याला देखील आश्चर्य वाटेल.
असे आहे प्रकरण
नांदुरा तालुक्यातील राजनगर येथील गणेश मुरलीधर वडोदे यांचे लग्न झाडेगाव येथील एक तरुणीशी २०११ साली झाले. काही वर्ष संसार सुरळीत चालल्यानंतर दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. डिसेंबर २०२० साली गणेश यांची पत्नी माहेरी रक्षाबंधनाला गेली. पतीसोबत भांडण होत असल्याने नाराज झालेली पत्नी परत आली नाही. पतीने वारंवार फोन केले असता पत्नीकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी वैतागलेल्या पतीने थेट सासुरवाडी गाठली. त्या ठिकाणी त्याला पत्नी दिसून आली नाही. पतीने चौकशी केल्यावर सासुरवाडीतील लोकांनी सांगितले की, ‘तुझ्या पत्नीने दुसरे लग्न केले व ती नांदायला गेली आहे.’ हे ऐकून पतीला जबर धक्काच बसला. ‘माझ्याशी घटस्फोट न घेता दुसऱ्याशी लग्न केलेच कसे? असा प्रश्न पतीने केला. त्याला कुठलेही उत्तर मिळाले नाही. अखेर पतीने नांदुरा येथे दाखल होऊन थेट पोलीस ठाण्यात पत्नी विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार चौकशीत ठेऊन त्यात कुठलीही कारवाई केली नाही. पत्नीवर कारवाई करण्यासाठी पती गणेशने पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवले. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पतीने पत्नीवर कारवाई करण्यासाठी नांदुरा येथील तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. घटस्फोट न घेता पत्नीने दुसऱ्याशी लग्न करणे हा गुन्हा असल्याने जोपर्यंत पत्नीवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नसल्याची भूमिका पतीने आता घेतली. पतीच्या या आंदोलनाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Husband fast action against wife because reading will surprise amy