आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

लग्न म्हणजे पवित्र सोहळा असतो. लग्नानंतर मुलगी आपल्या आईवडिलांचे घर सोडून पतीच्या घरी जाते. त्यानंतर तिच्यासाठी माहेरचे दरवाजे बंद होतात आणि पतीच तिच्यासाठी सर्वस्व असतो. अशावेळी तिच्या चारित्र्यावर पतीकडून संशय घेणे व मारहाण करून तिची प्रतारणा करणे ही एक प्रकारची क्रुरताच असते. अशा परिस्थितीत तिची इकडे आड व तिकडे विहीरस अशी अवस्था असते. त्यामुळे या जाचातून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी या महिला आत्महत्या करून मृत्यूला कवटाळत असल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्य़ात आरोपी पतीवर दया दाखविता येऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.

नरेश केशवराव गाणार (३४,रा. शेकापूर,ता. हिंगणघाट) याचा २००९ मध्ये ज्योती नावाच्या मुलीशी विवाह झाला. विवाहानंतरचे काही दिवस चांगले गेले. ते शेकापूर येथे राहात होते. त्यांना एक मुलगाही झाला. मात्र, काही दिवसांनी नरेशने तिला शिवीगाळ व मारहाण करणे सुरू केले. तिच्या चारित्र्यावरही तो संशय घेऊ लागला. दररोज दारू पिऊन तो घरी यायचा. ४ एप्रिल २०१४ ला नरेश रात्री १ वाजता दारू पिऊन घरी आला.

त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण व तिला मारहाण केली. सततच्या या जाचातून सुटण्यासाठी ती स्वयंपाकघरात गेली व स्वत:च्या अंगावर केरोसिन ओतून तिने जाळून घेतले. नरेशने तिला वाचविण्यासाठी तिच्या अंगावर पाणी टाकले आणि हिंगणाघाट येथील रुग्णालयात नेले. तेथे तिचे मृत्यूपूर्व बयाण नोंदविण्यात आले. तिची प्रकृती खालावत गेल्याने तिला वर्धा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांसमोर पुन्हा मृत्यूपूर्व बयाण नोंदविण्यात आले. त्यावेळी तिच्यासोबत नवरा नसल्याने तिने पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. पती आपल्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचेही तिच्या बयाणात नमूद आहे. त्यानंतर तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल करून आरोपी नरेशविरुद्ध खटला चालविला. सत्र न्यायालयाने महिलेने दुसऱ्यांदा मृत्यूपूर्वी दिलेले बयाण ग्राह्य़ धरून आरोपीला भादंविच्या ३०६ अंतर्गत सात वष्रे सश्रम कारावासाची, तर हुंडाबळी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा ठोठावली.

त्याने उच्च न्यायालयात धाव घेऊन पत्नीच्या पहिल्या मृत्यूपूर्वी बयानात काहीही नसल्याचा दावा करून निर्दोष सोडण्याची विनंती केली. त्यावेळी सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यावर न्या. सुनील शुक्रे यांनी उपरोक्त आदेश पारित केला.

मुलाच्या संगोपनाचा विचार करून शिक्षा कमी

आरोपीला पाच वर्षांचा मुलगा आहे. आरोपीने आतापर्यंत अडीच वर्षांची शिक्षा भोगली असून उर्वरित साडेचार वष्रे कारागृहात घालविले, तर त्याच्या मुलाचे संगोपन व शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल. मुलाचे संगोपन चांगल्याप्रकारे करता येण्यासाठी न्यायालयाने आरोपीने केलेला गुन्हा माफीलायक नसतानाही मुलाच्या दृष्टीने त्याने आतापर्यंत भोगलेली शिक्षा पुरेशी असून त्याला सोडण्याचे निर्देश दिले.