नागपूर: राज्याचे वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे कायमच आपल्या वक्तव्याने सर्वत्र चर्चेत असतात. नागपूर आणि मुंढे यांचा संबंध तसा फार जुना आणि वादग्रस्त आहे. नागपूरमध्ये महापालिकेला आयुक्त असतांना २० जून २०२० रोजी झालेल्या सुरेश भट सभागृहात सभेत तुकाराम मुंढे यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. त्यानंतर मुंढे यांची बदली करण्यात आली होती. रविवारी नागपूरमध्ये तुकाराम मुंढे यांचा अनेक वर्षानंतर जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात करियर मार्गदर्शक म्हणून ते उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठा गोंधळ घातला त्याचप्रमाणे त्रास सहन करावा लागला.

काय झाले कार्यक्रमात

स्मृतीशेष मधुकरराव तामगाडगे ट्रस्टच्या वतीने नागपुरात शिष्यवृत्ती वितरण आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर वसंतराव देशपांडे या महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यारीत येणाऱ्या वसंतराव देशपांडे सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कार्यक्रमा दरम्यान सभागृहात प्रचंड अव्यवस्थेचा सामना उपस्थित नागरिकांना करावा लागला. राज्यासह नागपूरभर पावसाचे वातावरण असले तरी विदर्भात उकाळा अजूनही कमी झालेला नाही. अशा परिस्थितीत देशपांडे सभागृहातील वातानुकूलित यंत्र बंद पडले होते. त्यामुळे उपस्थित नागरिकांसह मान्यवरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यामुळे मुंढे यांचा कार्यक्रम असल्याने जाणीवपूर्वक नागपुरात हा षडयंत्र तर करण्यात आला की काय अशी शंका उपस्थित केले जात होती.

नागपूरसोबत काय होता वाद?

२०२० मध्ये महापालिकेच्या स्थायी समितीने जवळपास ३१०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. तर तुकाराम मुंडेंनी जवळपास २५००कोटी रुपयांचे बजेट तयार केले होते. जी कामे गरजेची आहेत तीच प्राधान्याने करावीत, असे तुकाराम मुंढेंचे मत होते. त्यामुळे मग या दोन्ही बजेटमध्ये जवळपास ६०० कोटी रुपयांचा फरक राहिला. पण, मग महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केलेली अनेक कामे यामुळे लांबणीवर पडली. इथूनच मुंढे आणि महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांमधील वादास सुरुवात झाली. त्यानंतर हा वाद स्मार्ट सिटीच्या सीईओ म्हणून मुंढे यांनी घेतलेल्या निर्णयापर्यंत पोहोचला. यात तत्कालीन महापौर संदीप जोशी यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. मागील वर्षी डिसेंबरमध्ये तुकाराम मुंढे यांना या प्रकरणातून क्लिन चिट मिळाली.

नूतनीकरणावरील खर्चाचे काय

वसंतराव देशपांडे सभागृहाचे काही महिन्यांमध्ये सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले. याच्यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. असे असतानाही सभागृहात वातानुकूलित यंत्र बंद कसे पडले असा प्रश्न उपस्थित केला जातो. विशेष म्हणजे या सभागृहात नियमित कार्यक्रम होत असतानाही एसी बंद का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे असे सांगण्यात आले. मात्र त्यानंतरही सभागृहातील एसी सुरू करण्याला आला नाही.