नागपूर -राज्य शासनाने वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागात नियुक्तीचे आदेश होऊनही प्रत्यक्ष कार्यभार न मिळाल्यानंतर दीड महिन्यांपासून ते प्रतीक्षेत होते. त्यांच्या नव्या नियुक्तीमुळे प्रशासनात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

बदलीनंतरही प्रतीक्षेतच

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दीड महिन्यापूर्वी भारतीय प्रशासन सेवेतील दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या होत्या. त्यात तुकाराम मुंढे यांची दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या सचिवपदावरून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आदेश जाहीर झाल्यानंतरही त्यांना त्या पदाचा कार्यभार देण्यात आला नव्हता.

दिव्यांग विभागातील कारवाई ठरली कारणीभूत

दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत असताना मुंढे यांनी बोगस संस्थांविरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारला होता. अनुदान प्रक्रियेत गैरव्यवहार करणाऱ्या काही संस्थांची चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यामुळे नाराज झालेल्या संस्थाचालकांनी त्यांच्या बदलीसाठी दबाव वाढवल्याची चर्चा होती. त्यानंतर शासनाने त्यांची तातडीने बदली केल्याचे बोलले जात होते.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण

नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे महत्त्व वाढले आहे. या विभागाकडे कुंभमेळ्याच्या नियोजन, सुरक्षा आणि आपत्कालीन यंत्रणेची जबाबदारी राहणार आहे. केंद्र सरकारकडून मोठ्या निधीची अपेक्षा असल्याने या विभागातील निर्णय प्रक्रिया संवेदनशील मानली जात आहे. त्यामुळे मुंढे यांच्या नियुक्तीला विलंब झाल्याची चर्चा प्रशासन वर्तुळात रंगली होती.

कठोर कार्यशैलीची ओळख

सन २००५ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असलेल्या तुकाराम मुंढे यांनी विविध विभागांत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. आरोग्य, परिवहन, कृषी, आदिवासी विकास, पाणीपुरवठा आणि नियोजन विभागात त्यांनी काम केले आहे. नियमांबाबत कठोर भूमिका आणि थेट निर्णयक्षम शैलीमुळे ते कायम चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत २४ वेळा बदल्या झाल्या आहेत.

करोनाकाळातील कामामुळे ठसा

करोनाकाळात नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून मुंढे यांनी प्रभावी कामगिरी केली होती. लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी, क्वारंटाईन केंद्रांची उभारणी आणि संसर्ग नियंत्रणासाठी त्यांनी कठोर उपाययोजना राबवल्या होत्या. त्यांच्या निर्णयक्षमतेमुळे प्रशासनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले, मात्र काही स्तरांवर नाराजीही निर्माण झाली होती. आता अन्न व औषध प्रशासन विभागात त्यांची कार्यशैली कशी राहते, याकडे लक्ष लागले आहे.