नागपूर : अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा विषय नेहमीच चर्चेत असतो. त्यांच्या अनेक बदल्यामुळे ते लोकांमध्येही प्रसिद्ध झाले आहे. ते दोन दिवसांपासून विदर्भात आहे. काल, शनिवारी त्यांनी अमरावतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर आज, रविवारी नागपुरात एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमातून त्यांनी तरुणाईला मार्गदर्शन केले. या कार्यक्रमादरम्यान त्यांचे नागपुरातील जुने मित्रही त्यांना भेटले. ऐरवी कडक शिस्तीत असलेले मुंढे यावेळी मित्रांमध्ये हास्यविनोदात रंगल्याचेही दिसून आले.

मुंढेंनी केली सिकलसेल तपासणी

नागपुरात डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे शैक्षणिक शिष्यवृत्ती’ आणि सिकलसेल ग्रस्त मुलींना वैद्यकीय, शैक्षणिक सहकार्यासाठी ‘अथर्व शैक्षणिक शिष्यवृत्ती’ वितरण सोहळा रविवारी रंगला. या सोहळ्यातून त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमादरम्यान सिकलसेल तपासणीचे स्टॉलही लावण्यात आले होते. तुकाराम मुंढे यांनी या स्टॉलवर जाऊन सिकलसेल तपासणी केली.

अतुल लोंढेंनी फुलवले मुंढेंच्या चेहऱ्यावर हास्य

कॉंग्रेस नेते अतुल लोंढे आणि तुकाराम मुंढे हे आयएएस करताना एकमेकांचे चांगले मित्र झाले. त्यामुळे कॉंग्रेस नेते म्हणून नव्हे तर मित्र म्हणून मी तेथे गेलो होतो, असे अतुल लोंढे यांनी सांगितले. यावेळी तुकाराम मुंढे सिकलसेल तपासणी स्टॉलवर एकत्रच होते. तुकाराम मुंढे यांनी रक्ताचे नमुने दिले. त्यानंतर तेथेच उपस्थित मुंढे यांच्या मित्राने नमुन्यांचा निकालही लवकरच द्या, अशी टिप्पणी केली. यावर अतुल लोंढे यांनी लवकर निकाल यायला ती काही बदली आहे का, असा शेरा मारला अन एकच हशा पिकला.

जुन्या आठवणींना उजाळा

२०२०, जून महिन्याच्या २० तारखेला सुरेश भट सभागृहात महापालिकेची सभा आयोजित करण्यात आली होती. कोरोना काळामुळे सामाजिक अंतराच्या नियमामुळे या सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेवर तत्कालीन महापौर संदीप जोशी व सत्ताधारी व तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील वादाचे सावट होते. या सर्वसाधारण सभेत केटीनगर परिसरातील जागेवरील कोव्हिड-९ हॉस्टिपलसाठी आयुक्तांनी आरक्षण का हटवले, यावरून भाजपचे नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी पाँईट आफ इन्फर्मेशन अंतर्गत मुद्दा उपस्थित केला. दयाशंकर तिवारी यांनी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. यावरून संतप्त होत तुकाराम मुंढे रागारागाने सभागृहातून निघून गेले होते. या घटनेनंतर तुकाराम मुंढे यांनी ‘मी सभेतून निघून नाही गेलो, तर सभात्याग केला’, असे स्पष्टीकरणही दिले होते.