वर्धा : ICAI (Institute of Chartered Accountants of India) म्हणजेच ‘दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ ही भारतातील सनदी लेखापाल या व्यवसायाचे नियंत्रण आणि नियमन करणारी सर्वोच्च संस्था आहे.या संस्थेचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे असून संपूर्ण भारतात तिची प्रादेशिक कार्यालये आणि शाखा आहेत. ही भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या (Ministry of Corporate Affairs) अंतर्गत येणारी एक स्वायत्त व वैधानिक संस्था आहे. भारतात ‘चार्टर्ड अकाउंटंट’ (CA) होण्यासाठी आवश्यक असणारे अभ्यासक्रम तयार करणे, परीक्षा आयोजित करणे आणि उत्तीर्ण उमेदवारांना सनद देणे. भारतातील कंपन्या आणि संस्थांसाठी हिशोब आणि ऑडिटिंगशी संबंधित नियम व मानके तयार करणे ही जबाबदारी सांभाळणे.
प्रशिक्षणात मोठा बदल
याच संस्थेने सनदी लेखापाल (CA) शिक्षण आणि प्रशिक्षणात मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बदलत्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन सीए अभ्यासक्रमात एआयचा थेट समावेश केला जात आहे. यासाठी विद्यमान सीए विद्यार्थ्यांसाठी ‘ऑरा’ (AURA – AI Understanding for Rising Achievers) हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
ऑरा’ (AURA) उपक्रमाची वैशिष्ट्य
आयसीएआयचे अध्यक्ष सीए प्रसन्ना कुमार डी. आणि उपाध्यक्ष सीए मंगेश किनरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या विद्यार्थ्यांच्या सध्याच्या अभ्यासक्रमात एआयचा समावेश नव्हता त्यांच्यासाठी ‘ऑरा’ हा स्वतंत्र पूरक अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.या माध्यमातून सीए विद्यार्थ्यांनी व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना एआय तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान आणि प्रात्यक्षिक कौशल्ये मिळावीत, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.
अभ्यासक्रमाचे स्वरूप असे
या ऑनलाईन वर्कशॉपमध्ये फायनान्स, अकाउंटिंग, ऑडिटिंग, टॅक्सेशन, डेटा व्हिज्युअलायझेशन, रिपोर्टिंग, प्रेझेंटेशन आणि एआयचा नैतिक वापर यांसारख्या विषयांचे मार्गदर्शन केले जात आहे. हे प्रशिक्षण विकसित करण्यासाठी आयसीएआयने बाहेरील संस्थांवर अवलंबून न राहता आयटी आणि एआय क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनुभवी सीएंच्या मदतीने स्वतःचा वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम तयार केला आहे. आयसीएआयने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ५५ हजारांहून अधिक सीए आणि विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. ‘ऑरा-१’ च्या यशानंतर आता अधिक प्रगत (Advanced) एआय तंत्रज्ञानाचे धडे देण्यासाठी लवकरच ‘ऑरा-२’ हा पुढील टप्पा सुरू केला जाणार आहे.
भविष्यात एआय हा केवळ एक स्वतंत्र किंवा पूरक विषय न राहता, तो सीएच्या मूळ अभ्यासक्रमाचाच (Core Curriculum) एक भाग असेल, असेही आयसीएआयने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे भारतीय सीए विद्यार्थी जागतिक स्तरावर आधुनिक तंत्रज्ञानाने अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक बनण्यास मदत होणार आहे. ICAI च्या ‘AURA’ आणि AI सर्टिफिकेट कोर्सबद्दलची सविस्तर माहिती, त्याचा उद्देश आणि प्रात्यक्षिक अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
