लोकसत्ता टीम
नागपूर : रंग खेळण्यासाठी मित्रांची टोळी बनवून एकाच बाईकवर ट्रिपलसीट जाणार असाल किंवा दारु पिऊन गाडी चालवत असाल तर आताच सतर्क व्हा. कारण नागपूर पोलीस अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चांगला धडा शिकविण्यासाठी सज्ज आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलीस कोठडीत डांबण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. रंग खेळताना कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही, याची खबरदारी घ्या. शहर पोलिसांनी जवळपास ४ हजार पोलिसांचा ताफा रस्त्यावर तैनात केला आहे.
होळी, रंगपंचमीनिमित्त रस्त्यावरील मद्यपींचा अतिरेक रोखण्यासाठी पोलिसांनी शहरात सर्वत्र नाकाबंदी लावून ड्रंक अॅन्ड ड्राइव्हविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. याशिवाय मुख्य रस्त्यासह गल्लीबोळातसुध्दा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दीची ठिकाणे, दाट आणि मिश्र वस्त्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांना यावर्षी लक्ष्य करण्यात येणार आहे. शहरात अनेक गृहनिर्माण संस्था, उत्सव मंडळे आणि इमारतीच्या पटांगणासर रस्त्यावरही रंगोत्सव साजरा केला जातो. उत्सवाच्या नियोजनानुसार शुक्रवारी रंगपंचमीसाठी सर्व जण घराबाहेर पडतात.
यादरम्यान समाजकंटकांकडून गैरप्रकार करुन उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धुळवळीच्या दिवशी महिला-तरुणींची छेड काढणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, अश्लील शेरेबाजी असे प्रकार घडतात. जातीय तेढ निर्माण होऊ नये तसेच असा गैरप्रकार टाळण्यासाठी आणि सलोखा राखण्यासाठी पोलीस खबरदारी घेत आहेत. होळी, रंगपंचमीसाठी दारू आणि पार्ट्या हे समीकरण बनले आहे. त्या पार्श्वभूमीवर अपघात होऊ नयेत, रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या पादचारी, वाहनांना त्रास होऊ नये, महिलाविरोधी गुन्हे घडू नयेत, धर्म किंवा समाजभावना दुखावून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टिकोनातून बंदोबस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाईचे नियोजन केल्याचे पोलीस सहआयुक्त निसार तांबोळी यांनी सांगितले आहे.
रंगाचे फुगे मारल्यास कारवाई
अनेक जण भरधाव दुचाकीने जाऊन रस्त्यावरील मुली, तरुणी आणि महिलांवर रंगाच्या पाण्याने भरलेले फुगे फेकून मारतात. तसेच वृद्धांवरसुद्धा फुगे फेकल्या जातात. फुग्यातील रंग डोळ्यात गेल्यास डोळा निकामी होण्याची शक्यता असते. तसेच फुग्यांमुळे जखमी होऊ शकते. त्यामुळे जर कुणी रंगाचे फुगे फेकून मारल्यास थेट गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
स्टंटबाजी करणाऱ्यांच्या दुचाकी जप्त
धुळवळीनिमित्त फुटाळा, अंबाझरी, धरमपेठ, सक्करदरा, महाल, सीताबर्डीसह अन्य परिसरात काही तरुण-तरुणी बाईकने स्टंटबाजी करतात. तसेच बाईकची रेस खेळतात. बाईकचा आवाज आणि धोकादायक बाईक चालविल्यामुळे रस्ते अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर कुणी स्टंटबाजी केली तर अशा वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहआयुक्त निसार तांबोळी यांनी दिली.