चंद्रपूर : गेल्या काही वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारीचे राजकीयकरणं झाले. गुन्हेगारांना राजकीय संरक्षण देण्यात आले. या सर्व घडामोडी बघता गुन्हेगार व गुंडांसाठी राजकीय नेत्यांचे फोन आले तर ते प्रसिद्ध करावे, अशी सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना केली आहे.
गेल्या ३५ दिवसांमध्ये जिल्ह्यात चार वेळा गोळीबार व एक वेळा पेट्रोल बॉम्ब हल्ला झाला आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्यापासून गोळीबार व गंभीर गुन्ह्याचे सत्र जिल्ह्यात सुरूच आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी रेती तस्करीच्या प्रकरणात शिवसेना युवा पदाधिकारी शिवा वझरकर याची चाकू भोसकून हत्या झाली होती. तेव्हापासून जी अशांतता पसरली आहे ती आताही सुरूच आहे. अतिशय शांत असलेल्या या जिल्ह्यात गुन्हेगारांच्या टोळी युद्धाने ही अशांती पसरली आहे. कोळसा, रेती, गुटखा, तंबाखू, ऑनलाईन सट्टा असे कितीतरी अवैध व्यवसाय या जिल्ह्यात राजकीय आशीर्वादाने सुरू आहे. राजकीय नेत्यांनीच या गुन्हेगार व गुंडांना पाठिंबा आहे. काही पक्षाच्या राजकीय नेत्यांचे वाढदिवस, तथा सणासुदीच्या होर्डिग, बॅनर पोस्टर बघितले तर सर्व रेती तस्कर, कोळसा, जुगार, गुटखा, तंबाखू तस्करीत गुंतलेल्यांची छायाचित्रे बघायला मिळतात.
हेही वाचा…ओबीसी विभागात कंत्राटी भरती! नियमित भरती नसल्यामुळे संघटना नाराज
आता तर शहरातील मुख्य चौक, सार्वजनिक ठिकाणी मोठे गुन्हे सहज घडत असताना दिसत आहे, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन गुन्हेगारांना वठणीवर आणण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असले तरी पोलीस प्रशासन सदर गुन्हे नियंत्रित करण्याबाबत अपयशी ठरला आहे. त्याला वेगवेगळी करणे आहेत. सोमवारी कुख्यात गुंड हाजी सरवर शेख यांची बिनबा गेट समोरील हॉटेल शाही दरबार येथे ६ जणांनी मिळून गोळ्या झाडत चाकूने वार करीत हत्या केली. सहा युवक भर दुपारी चंद्रपूर शहरात ४ बंदुका व चाकू घेऊन फिरत असताना पोलीसांना याबाबत थांगपत्ता का लागला नाही? असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत घडलेल्या गोळीबाराच्या घटना सार्वजनिक ठिकाणी घडल्या आहे, चंद्रपूर शहरात २, राजुरा व बल्लारपूर येथे प्रत्येकी १ घटना घडली असून आतापर्यंत टोळी युद्धातून दोघांनी जीव गमावला आहे. विशेष बाब म्हणजे हाजी ची हत्या झाल्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात हाजी समर्थक व हाजी चे राजकीय समर्थकांनी गर्दी केली होती, लोकप्रतिनिधी आता गुंडासमोर लोटांगण कसे घालतात हे यातून सिद्ध झालेले आहे. हाजी हा काँग्रेस पक्षात सक्रिय होता. नकोडा ग्राम पंचायतचा माजी उपसरपंच होता. हत्या प्रकरणात कारागृहात शिक्षा भोगून आलेला, हद्दापरीची कारवाई झालेला, नक्षलवाध्याना शास्त्र पुरवठा प्रकरणात देखील त्याच्यावर मोक्का लागला होता.
हेही वाचा…चंद्रपूर : ‘या’ कारणातून हाजी सरवरची हत्या; नागपूर, दिग्रसमध्ये शिजला कट
इतके गंभीर स्वरूपाचे गुन्हे असताना देखील काँग्रेस पक्षाच्या स्थानिक लोकप्रतिनिधी सोबत खुलेआम त्याची बैठक असायची. लोकप्रतिनिधी हा जनतेचा प्रतिनिधी असतो मात्र गुंडांसाठी रुग्णालयात गराडा घालणे म्हणजे जनतेला हा काय संदेश जात आहे असाही प्रस्न आता राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे. गुन्हेगारांना राजकीय आशीर्वाद व संरक्षण मिळत असल्याचे बघूनच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुन्हेगारीचा कॅन्सर वाढू देणार नाही, गुन्हेगार व गुंडासाठी राजकीय नेत्यांचे फोन जात असेल तर ते प्रसिद्ध करण्याची सूचना पोलीस अधीक्षक यांना केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुंडांना राजकीय संरक्षण देणे बंद करा असे निर्देश पोलीस विभागाला दिले आहे.चंद्रपुरातील टोळीयुद्धातून गोळीबाराच्या घटनेवर पालकमंत्री मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना कडक कारवाई करा असेही सांगितले. मागील काळात गुन्हेगारांना राजकीय संरक्षण दिले जात आहे. ही गंभीर बाब असून गुन्हेगारांना राजकीय नेतृत्वाने पाठीशी घालू नये असे मत त्यांनी व्यक्त केले.