काही सेवांच्या खासगीकरणासाठी चाचपणी

नागपूर : वैद्यकीय शिक्षण खाते गेल्या अनेक वर्षांपासून काही सेवा सार्वजनिक, खासगी भागीदारी तत्त्वावर करता येतात काय? म्हणून चाचपणी करत आहे. इंटरनॅशनल फायनान्स कार्पोरेशन (आयएफसी) या विदेशी कंपनीने या कामासाठी इच्छा दर्शवली. दरम्यान या कंपनीचे प्रतिनिधी बुधवारपासून विदर्भातील काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना भेट देत चाचपणी करणार आहे. त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण वैद्यकीय शिक्षण खात्याचे लक्ष लागले आहे.

वैद्यकीय शिक्षण खात्याने तडकाफडकी नागपूरच्या मेडिकलसह इतरही काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अधिष्ठात्यांना तातडीने मंगळवारी मुंबईत बैठकीसाठी बोलावले. यावेळी पुन्हा अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सार्वजनिक- खासगी भागीदारी तत्त्वावर कुणी सेवा द्यायला तयार असल्यास त्याला ती देण्याबाबत संमती दर्शवली गेली. यावेळी नागपूरच्या मेडिकल, मेयोतील काही सेवा देण्याची इच्छा दर्शवत आयएफसी या कंपनीने बुधवारपासून निरीक्षण करण्याची तयारी दर्शवली. तातडीने त्यांना होकार दर्शवला गेला. दरम्यान या कंपनीचे काही वरिष्ठ अधिकारी बुधवारी भंडारात एका जागेची पाहणी करणार आहे. त्यानंतर मेयो रुग्णालय, मेयोच्या अखत्यारित डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व मेडिकल रुग्णालयाची पाहणी करतील.

बैठकीत या पद्धतीने रुग्णांना चांगल्या सेवा मिळण्यासह शासनाचे पैसे वाचणार असल्यास हा प्रकल्प चांगला राहणे शक्य असल्याचेही स्पष्ट केले गेले. दरम्यान, सध्या नागपूरच्या मेडिकलमध्ये एमआयआर यंत्र लवकरच उपलब्ध होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याव्यतिरिक्त बहुतांश सेवा येथे उपलब्ध आहे. त्यामुळे मेडिकलमध्ये हा प्रकल्प शक्य आहे काय? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. तर नुकतेच मंत्रिमंडळाने उत्तर नागपुरातील डॉ. आंबेडकर रुग्णालय व पदव्युत्तर संस्थेला मंजुरी दिली.

ही संस्था तातडीने उभारण्याबाबत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ते या संस्थेतील सेवा खासगीकरण करण्यास तयार होतील काय? याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या वृत्ताला एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.