मुस्लीम मंचची नाराजी दूर करण्यासाठी संघाकडून मनधरणी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत मुस्लीम राष्ट्रीय मंचने रेशीमबागेतील स्मृती मंदिरात रमजानची इफ्तार पार्टी आयोजित करण्याची मागणी केली होती. मात्र, संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यास विरोध केल्याने नाराज झालेल्या मुस्लीम मंचच्या पदाधिकाऱ्यांची आता संघाकडून मनधरणी सुरू झाली आहे. पुढील वर्षी तिथे इफ्तार पार्टीचे आयोजन करू, असे आश्वासन दिले जात आहे.

मुस्लीम समाजाला संघाशी जोडण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक इंद्रेशकुमार यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम राष्ट्रीय मंचची स्थापना संघाचे मुख्यालय असलेल्या उपराजधानीत करण्यात आली. गेल्या काही वर्षांत मंचची संमेलने आणि विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यातून मुस्लिमांना संघासोबत जोडण्याचे प्रयत्न झाले.

रमजानच्या निमित्ताने संघाचे मुख्यालय असलेल्या स्मृती मंदिरात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यासंदर्भात मंचच्या पदाधिकाऱ्यांनी प्रस्ताव ठेवला होता. यातून देशात एकतेचा संदेश जाईल, असेही त्यांनी सूचित केले होते. मात्र, स्मृती मंदिरात तृतीय संघ शिक्षा वर्ग सुरू असल्याचे कारण देत संघाने त्यांचा प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे मंचचे पदाधिकारी नाराज झाले. त्यांनी उघडपणे आपली नाराजी संघाच्या पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली. त्यामुळे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुस्लीम मंचच्या पदाधिकाऱ्यांना यंदा नाही, पण पुढील वर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्याचे आश्वासन देत त्यांची त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मोबाइलद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न असता तो होऊ शकला नाही.

दरम्यान, संघ एकीकडे सामाजिक समरसतेचे सूत्र घेऊन देशभरात कार्यविस्तार करीत असताना इफ्तार पार्टीला नकार देणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न मुस्लीम समुदायामध्ये उपस्थित केला जात आहे.

देशभरात सामाजिक समरसतेचा संदेश जावा आणि मुस्लीम समाज संघाशी जोडला जावा, या उद्देशाने राष्ट्रीय मुस्लीम मंचने महानगर संघचालक राजेश लोया, विराग पाचपोर यांच्याशी इफ्तार पार्टीबाबत चर्चा केली होती. मात्र, संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला नकार दिला. परंतु, पुढील वर्षी २०१९ मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाईल आणि ईद साजरी केली जाईल असे सांगितले. संघाविरोधात आमची कुठलीही नाराजी नाही. मात्र, इफ्तार पार्टीचे आयोजन संघ मुख्यालयात केले असते, तर देशभरात वेगळा संदेश गेला असता.

मो. फारुक शेख, नागपूर शहर प्रमुख, मुस्लीम राष्ट्रीय मंच

मुस्लीम राष्ट्रीय मंचने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात इफ्तार पार्टी करण्यासंदर्भात कुठलीही परवानागी मागितली नाही आणि त्यासंदर्भात माझ्याशी कुठलीही चर्चा झाली नाही. यावर्षी किंवा २०१९ मध्ये या इफ्तार पार्टी किंवा इतर कुठलाही कार्यक्रम संघ स्थानावर प्रस्तावित नाही.

विराग पाचपोर, संघटन संयोजक