नागपूर : देशात नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले असले तरी शिक्षण क्षेत्रामध्ये त्याविषयी अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) देशभरातील पंधरा लाख शिक्षकांमध्ये नवीन धोरणाबाबत जागृती करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी विविध चित्रफिती तयार केल्या आहेत. तसेच प्रत्येक राज्यातील तज्ज्ञ मंडळी नवीन शिक्षण धोरणाबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

१९८६ नंतर पहिल्यांदाच जुलै २०२१ मध्ये नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले.  या धोरणामध्ये भारताच्या शिक्षण व्यवस्थेला भेडसावणाऱ्या विविध आव्हानांवर उपाय सुचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून नवे शिक्षण धोरण अमलात आणले जात आहे. मात्र, याबाबत अनेकांना माहिती नाही. त्यासाठी आता इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने पुढाकार घेतला असून एक विशेष जागृती कार्यक्रम लवकरच सुरू केला जाणार आहे.   ‘नवे शैक्षणिक धोरण-जागरूकता विकास कार्यक्रम’ असे या प्रशिक्षणाचे नाव आहे. या प्रशिक्षणासाठी ‘इग्नू’ने चित्रफीत व प्रशिक्षण साहित्य तयार केले असून स्थानिक पातळीवरील तज्ज्ञ मार्गदर्शकांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात सहभागी होण्यासाठी शिक्षकांना नोंदणी करावी लागले. 

राज्यांचे नियोजन सुरू

हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थानिक भाषांसह हिंदी व इंग्रजीमध्येदेखील राबवला जाईल. या प्रशिक्षणाचा फायदा देशभरातील १५ लाखांहून अधिक शिक्षकांना घेता येणार आहे. नवीन शिक्षण धोरण लागू करण्याच्या दिशेने अनेक राज्यांनी नियोजन सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘इग्नू’ने उचललेले पाऊल महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे.

‘इग्नू’ने ‘नवे शैक्षणिक धोरण-जागरूकता विकास कार्यक्रम’ सुरू केला असून देशभरातील पंधरा लाख शिक्षकांमध्ये जागृती केली जाणार आहे. यासाठी अनेक तज्ज्ञांची मदतही घेतली जाणार आहे.

डॉ. पी. शिवस्वरूप, विभागीय संचालक, इग्नू