नागपूर : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी) नागपूरच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक तब्बल ६० लाख रुपये वार्षिक वेतनाचे ‘पॅकेज’ मिळाले आहे. सन २०१६-१७ मध्ये नागपुरात ‘ट्रिपल आयटी’ची सुरुवात झाली. देशभरातील २० ‘ट्रिपल आयटी’तील नवीन संस्थांमध्ये नागपूरचा समावेश होतो. संस्थेचा पाचवा दीक्षांत सोहळा मंगळवारी पार पडला.

‘ट्रिपल आयटी’मध्ये सध्या सहा शाखांमध्ये शिक्षण सुरू आहे. पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी.ला संस्थेमध्ये ७२५ पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांची जागतिक दर्जाच्या विविध संस्थांमध्ये निवड झाली. यंदा ‘ट्रिपल आयटी’मध्ये २१४ कंपन्यांनी भेट दिली. त्यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये संस्थेमधील ९४ टक्के विद्यार्थ्यांची निवड झाली. हा सुद्धा एक विक्रम आहे. यात काही विद्यार्थ्यांना सर्वाधिक ६० लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक वेतनाचे ‘पॅकेज’ मिळाले.

सर्वात कमी सरासरी १२ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक ‘पॅकेज’वर विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. ‘प्लेसमेंट ड्रायईव्ह’मध्ये जागतिक दर्जाच्या कंपन्यांनी सहभाग घेतला होता. ट्रिपल आयटीच्या स्थापनेपासून दरवर्षी येथील नोकरीचा टक्का हा ९० टक्क्यांच्या वर आहे. तसेच विद्यार्थ्यांना मिळणारे वार्षिक ‘पॅकेज’ही ५० लाखांहून अधिक आहे हे उल्लेखनीय.

संस्थेची विशेषत:

हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल प्रा. लि. यांच्यासोबतची धोरणात्मक भागीदारी.

ब्रह्माकुमारी संस्थेसोबत केलेला सामंजस्य करार.

९.२ कोटी किमतीचे प्रायोजित संशोधन प्रकल्प, ज्यामध्ये आयआयटी मुंबई सोबतचा ६.१५ कोटींचा प्रकल्प विशेष उल्लेखनीय आहे.

३३.९५ लाख किमतीचे सल्लागार (कन्सल्टन्सी) प्रकल्प.

संस्थेच्या प्राध्यापकांनी मिळवलेली उल्लेखनीय यश म्हणजे २८ पेटंट्स (८ मंजूर, २० प्रकाशित).