नागपूर: भारतीय व्यवस्थापन संस्थेने (आयआयएम नागपूर) देशातील आयआयटी संस्थांशी सामंजस्य करार करून अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शिक्षणाचे एकत्रित पाच वर्षांचे नवे शैक्षणिक प्रारूप राबवण्याची तयारी सुरू केली आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना साडेतीन वर्षांत बी.टेक. आणि त्यानंतर अडीच वर्षांत एमबीए अशी दुहेरी पदवी पाच वर्षांत मिळू शकणार आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी दिली.
कसा असेल अभ्यासक्रम
डॉ. मेत्री यांच्या पाच वर्षांच्या नव्या कार्यकाळासाठी पुन्हा नियुक्तीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना संस्थेच्या आगामी विस्तार योजनांचा तपशील मांडला. आयआयटीसोबतच्या प्रस्तावित करारानुसार, बी.टेक. अभ्यासक्रमातील साडेतीन वर्षे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीए प्रवेशासाठी संधी दिली जाणार असून, त्यासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. जेईई हीच पात्रता परीक्षा राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, आयआयएम नागपूरचा शैक्षणिक परिसर विस्ताराचा टप्पा सुरू असून लवकरच हा संयुक्त अभ्यासक्रम प्रत्यक्षात आणला जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
पुणे आणि गोव्यामध्ये विस्तार
संस्थेच्या विस्तार आराखड्यात पुणे आणि गोवा येथे नवे शैक्षणिक परिसर उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. तसेच पुढील पाच वर्षांत २० आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी शैक्षणिक भागीदारी करून दुहेरी पदवी कार्यक्रम सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता, इंडस्ट्री ४.०, डिजिटल तंत्रज्ञान आणि उत्पादन व्यवस्थापन या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही डॉ. मेत्री यांनी सांगितले. २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार, आयआयएम नागपूरला जगातील आघाडीच्या १०० व्यवस्थापन संस्थांमध्ये आणि आशियातील पहिल्या दहा व्यवस्थापन संस्थांमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या विस्तार योजनेंतर्गत ३०० क्षमतेचे वसतिगृह, ६०० क्षमतेची खानावळ व सभागृह, कार्यकारी अतिथीगृह, नवीन वर्गखोल्या आणि स्वतंत्र ग्रंथालय अशा पायाभूत सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.
विकासात संस्थेचा सहभाग वाढणार
आयआयएम नागपूर केवळ व्यवस्थापन शिक्षणापुरते मर्यादित न राहता विदर्भ आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी ‘ग्रोथ इंजिन’ ठरेल, असा विश्वासही डॉ. मेत्री यांनी व्यक्त केला. उद्योजकता, सार्वजनिक धोरण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात संस्थेचा सहभाग वाढवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.
