नागपूर : भारतीय व्यवस्थापन संस्था (नागपूर) येथे संस्थेची परवानगी न घेता बाहेर पूल पार्टी केल्यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशी संस्थेत प्रवेश नाकारण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, आयआयएम, नागपूरच्या एमबीए अभ्यासक्रमाचे प्रथम आणि द्वितीय वर्षाचे विद्यार्थी शनिवारी, १४ फेब्रुवारी रोजी एका रिसॉर्टवर ‘पूल पार्टी’ करण्याकरिता गेले होते. सुमारे ७० ते ७५ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या पार्टीत सहभागी होते. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना सेंड ऑफ देण्यासाठी ही पार्टी आयोजित केली होती. रात्रभर बाहेर राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते संस्थेत परतले असता त्यांना संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी प्रवेश करण्यापासून रोखले , असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, सोमवारी रात्री यापैकी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना आयआयएम प्रशासनाने ई-मेल पाठवून शिस्तभंगाची कारवाई म्हणून त्यांना मिड टर्म परीक्षा देता येणार नसल्याचे कळविले.

प्रथम वर्षाची ही परीक्षा मंगळवार, २४ फेब्रुवारीपासून सुरू होणार होती. त्याचप्रमाणे, द्वितीय वर्षाची अंतिम परीक्षा २५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे हे अंतिम सत्र असल्याने आपल्याला परीक्षेपासून रोखल्यास आपल्या करियरचे नुकसान होऊ शकते, अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. त्यातून, दोन्ही वर्षांच्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी संस्थेत मूक निदर्शने सुरू केली. परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला. अखेर, संस्था प्रशासनाने ही कारवाई पार्टीकरिता गेलेल्या केवळ प्रथम वर्षाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवरच केल्याचे स्पष्ट केले. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. प्रथम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली गेली, त्यांची मिड टर्म परीक्षा पुन्हा कधीतरी घेतली जाईल, असेही आयआयएमने स्पष्ट केले आहे. संस्था प्रशासनाच्या या भूमिकेनंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

विद्यार्थिनींच्या घरी फोन

पार्टी केलेल्या समुहात ज्या विद्यार्थिनी होत्या, त्यांच्या पालकांना संस्थेच्यावतीने फोन करून या प्रकरणाची कल्पना देण्यात आली. विद्यार्थिनींनी संस्थेचे नियम मोडल्याचे आणि त्या रात्रभर मुलांबरोबर बाहेर राहिल्याचेही पालकांना कळविण्यात आले. यावरही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतले. विद्यार्थिनींप्रमाणेच विद्यार्थ्यांच्या पालकांना का कळविण्यात आले नाही, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

दहानंतरची परवानही नाहीच

हे सर्व विद्यार्थी संस्थेच्या परिसरातच राहतातच. रात्री दहानंतर बाहेर जाऊ नये आणि संस्थेला कळविल्याशिवाय अनुपस्थित राहू नये असे नियम आहेत. पार्टी करायला गेलेल्या विद्यार्थ्यांनी ते घरी जात असल्याचे रजिस्टरमध्ये नमूद केले आणि ते पार्टी करून दुसऱ्या दिवशीच परत आले. संस्थेने विद्यार्थ्यांना या घटनेबाबत पालकांचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले. विद्यार्थ्यांना एमबीए अभ्यासक्रमातून काही काळासाठी निलंबित केले जाईल, असेही मेलमध्ये नमूद करण्यात आल्याची माहिती आहे.