यवतमाळ : आयआयटी मुंबईच्या उंच इमारतीतून देशाच्या ऊर्जा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचे स्वप्न पाहणारा येथील साहिल रवींद्र वाकोडे केवळ अभ्यासात हुशार विद्यार्थी नव्हता. लहानपणापासूनच स्केटिंग, टेनिस, बॅडमिंटन आणि क्रिकेटची आवड असलेला साहिल खेळातही प्रावीण्य मिळवत होता. केजी-१पासूनच त्याची हुशार विद्यार्थी म्हणून ओळख होती. मोठ्यांना पाहताच नमस्कार करून पाया पडणारा, कायम हसतमुख राहणारा साहिल परदेशात जाऊन भारताचे नाव मोठे करण्याचे स्वप्न उराशी बाळगून होता. त्याच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले, ‘तो नेहमी काहीतरी नवीन करण्याचा विचार करायचा.’

नागपूरला येण्याआधीच सर्व थांबले

याच स्वप्नांच्या वाटेवर साहिल आयआयटी मुंबईपर्यंत पोहोचला. एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकत असताना अभ्यासाबरोबरच तंत्रज्ञानाच्या प्रयोगांमध्येही त्याला रस होता. गेल्या रविवारी (२० सप्टेंबर) रोबोट तयार करण्यासाठी त्याची टीम हैदराबादला जाणार होती. मात्र, साहिल नागपूरला येणार होता. मित्र आणि परिचित आज त्याच्या या छोट्याशा नियोजित प्रवासाची आठवण सांगताना गहिवरून जात आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत भविष्यातील योजना आखणारा साहिल आता त्या योजनांचा भाग राहिलेला नाही, हीच कुटुंबीयांसाठी सर्वांत मोठी शोकांतिका ठरली आहे.

बॅडमिंटन असोसिएशनकडून निवेदन

साहिलच्या मृत्यूनंतर त्याच्याबाबत विविध आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना यवतमाळ जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे धम्मशील बोरकर यांनी साहिलच्या व्यक्तिमत्त्वाची दुसरी बाजू समोर आणली आहे. ‘साहिल खूप हुशार आणि मेहनती विद्यार्थी होता. तो उत्तम बॅडमिंटन खेळाडूही होता. त्याच्यावर करण्यात येत असलेले आरोप आम्हाला चुकीचे आणि निराधार वाटतात. या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी झाली पाहिजे,’ अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अरुण लखानी यांना निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

साहिलला परीक्षेतून बाहेर काढतानाच्या व्हिडीओची चर्चा

दरम्यान, साहिलच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती शोधण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे. तपासात परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही चित्रफिती, साहिलच्या हालचाली आणि त्याच्या मोबाईलसह अन्य बाबी तपासल्या जात असल्याचे वृत्त आहे. परीक्षा केंद्रातून साहिलला बाहेर जाण्यास सांगितल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र, या दृश्यांचा आणि त्यानंतर घडलेल्या घटनांचा नेमका संबंध काय, हे तपासातूनच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणात आता आयआयटी मुंबईची भूमिकाही बदलताना दिसत आहे. साहिलच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी संस्थेने केलेल्या निवेदनाबद्दल सोमवारी जाहीर माफी मागण्यात आली. तपास सुरू असताना मृत्यूपूर्वीच्या घटनांचे तपशील निश्चित स्वरूपात मांडणे योग्य नव्हते, असे संस्थेने स्पष्ट केले.

आयआयटी मुंबईत घडामोडी वाढल्या

तीन दिवसांच्या विद्यार्थी आंदोलनानंतर आयआयटी मुंबईच्या संचालकांनी विद्यार्थ्यांच्या १८ कलमी मागण्यांच्या चार्टरवर स्वाक्षरी केली आहे. साहिलच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी, विद्यार्थी कल्याण व्यवस्था मजबूत करणे, प्राध्यापकांसाठी आचारसंहिता, मानसिक आरोग्य सुविधा आणि तक्रार निवारण प्रक्रियेत बदल अशा मागण्यांचा त्यात समावेश आहे. विद्यार्थ्यांनी चौकशीचा अंतरिम अहवाल ३० सप्टेंबरपर्यंत आणि अंतिम अहवाल १५ ऑक्टोबरपर्यंत देण्याची मागणी केली आहे.

प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांना प्रशासनातील डीनपदाच्या जबाबदारीतून तपास पूर्ण होईपर्यंत दूर करण्यात आले असून ते प्राध्यापक म्हणून मात्र कार्यरत राहणार आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांना केवळ प्रशासकीय पदावरून नव्हे, तर तपासाच्या काळात अध्यापनाच्या जबाबदारीतूनही दूर करण्याची मागणी केली होती. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, डुल्ला यांना दोषी ठरविणे हा आंदोलनाचा उद्देश नसून तपास सुरू असताना त्यांना प्रशासकीय जबाबदारीपासून दूर ठेवण्याची मागणी होती. एकीकडे साहिलच्या कुटुंबीयांनी जातीय छळाचे आरोप केले आहेत, तर दुसरीकडे आयआयटीच्या फॅकल्टी फोरमने प्रा. डुल्ला यांची बाजू घेत त्यांनी संस्थेच्या निर्धारित प्रक्रियेनुसार काम केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोप आणि प्रत्यारोपांपेक्षा आता तपासातून समोर येणारे पुरावे महत्त्वाचे ठरणार आहेत. परदेशात भारताचे नाव मोठे करण्याच्या स्वप्नापर्यंत त्याच्यासमोर अनेक वाटा खुल्या होत्या. त्या वाटांवर साहिल आता नाही. मात्र, त्याच्या मृत्यूमागची सत्य परिस्थिती शोधून काढणे आणि भविष्यात अशा कोणत्याही विद्यार्थ्याला एकटेपणाचा सामना करावा लागू नये, हीच साहिलला खरी श्रद्धांजली असल्याचे त्याच्या शाळकरी मित्रांनी म्हटले आहे.