यवतमाळ : दहावीला ९० टक्के, बारावी विज्ञान शाखेत ७६ टक्के, जेईई अॅडव्हान्स्डमध्ये ६१४ क्रमांकाची कामगिरी आणि आयआयटी मुंबईच्या पहिल्या वर्षात ८.५ सीजीपीए. छोट्या गावातून आयआयटी मुंबईपर्यंत पोहोचलेल्या साहिल रवींद्र वाकोडेच्या शैक्षणिक प्रवासाची ही ओळख. ज्या विद्यार्थ्याने देशातील अत्यंत कठीण अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतून आयआयटी गाठली आणि तेथेही चांगली शैक्षणिक कामगिरी केली, त्याच्यावर मिड सेमिस्टर परीक्षेत मोबाईल वापरून कॉपी केल्याचा आरोप झाला. याच आरोपाचा मानसिक धक्का बसल्याने साहिलने स्वतःला संपविल्याची चर्चा आहे.

शैक्षणिक गुणवत्तेकडे नव्याने बघण्याची गरज

या घटनेनंतर आयआयटी मुंबईने आपल्या आधीच्या निवेदनाबद्दल जाहीर माफी मागत, तपास पूर्ण होण्यापूर्वी घटनेपूर्वीच्या घटनांचे स्वरूप निश्चितपणे मांडणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे साहिलच्या संपूर्ण शैक्षणिक गुणवत्तेकडे पुन्हा पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. साहिलची गुणवत्ता जेईई प्रवेश परीक्षेपुरती मर्यादित नव्हती. दहावीमध्ये त्याने ९० टक्के तर बारावी विज्ञान शाखेत ७६ टक्के गुण मिळविले. जेईई अॅडव्हान्स्डच्या माध्यमातून त्याने आयआयटी मुंबईत प्रवेश मिळविला. साहिलला अनुसूचित जाती प्रवर्गात ऑल इंडिया ६१४ रँक असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.

आयआयटी मुंबईतील पहिल्या वर्षात साहिलचा ८.५ सीजीपीए होता, ही बाब त्याच्या शैक्षणिक कामगिरीचे महत्त्व अधोरेखित करते. आयआयटी मुंबईच्या ग्रेडिंग पद्धतीत १० गुणांची श्रेणी असून, विविध ग्रेडना गुण दिले जातात. संस्थेच्या अधिकृत नियमावलीनुसार ८.५ ते ९.५ दरम्यानचा ग्रेड पॉइंट ‘एबी’ श्रेणीत येतो. याच पार्श्वभूमीवर मिड सेमिस्टर परीक्षेतील कथित मोबाईल वापराचा मुद्दा अधिक महत्त्वाचा ठरतो. घटनेनंतर आयआयटी मुंबईने सुरुवातीच्या निवेदनात साहिल परीक्षेदरम्यान मोबाईल वापरताना आढळल्याचे आणि चॅटजीपीटीचा वापर केल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर संस्थेने स्वतःच त्या निवेदनातील उल्लेखांबद्दल माफी मागितली. तपास सुरू असताना साहिलच्या मृत्यूपूर्वी नेमके काय घडले, याबाबत निष्कर्षाप्रत पोहोचणे योग्य नव्हते, असे संस्थेने स्पष्ट केले.

तपासाकडे लक्ष…

दरम्यान, या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे. साहिल परीक्षा केंद्रातून बाहेर पडल्यानंतर त्याच्या हालचालींचा घटनाक्रम सीसीटीव्हीच्या आधारे तपासला जात असल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी स्वतंत्र चौकशी, विद्यार्थी कल्याण आणि तक्रार निवारण व्यवस्थेत सुधारणा यांसह १८ मागण्या केल्या आहेत. साहिलच्या मृत्यूच्या कारणांबाबत अनेक दावे, आरोप आणि प्रतिदावे पुढे येत आहेत. कुटुंबीयांनी जातीय छळाचे आरोप केले आहेत; काही विद्यार्थ्यांनी मात्र त्यांच्याशी असहमती व्यक्त केली आहे. या सर्व बाबी सध्या तपासाधीन आहेत. त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्याआधी तपासातून समोर येणारे पुरावे महत्त्वाचे ठरणार आहेत. पण या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी असलेली साहिलची गुणवत्ता दुर्लक्षित होता कामा नये, असे त्याचे निकटवर्तीय म्हणतात. जेईईची कठीण परीक्षा पार करून मिळविलेला आयआयटी प्रवेश आणि पहिल्याच वर्षात मिळविलेला ८.५ सीजीपीए ही साहिलच्या गुणवत्तेची ओळख आहे.